तिच्यामुळे तो कायम ‘अजिंक्य’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं…मंगेश पाडगावकरांच्या ओळी आतापर्यंत तुम्ही आम्ही अनेकदा ऐकल्या असतील. सेलिब्रेटी-क्रिकेटपटू यांच्या परीकथेसारख्या प्रेमकहाण्या आपण वाचल्या आहेत…पण मराठमोळा अजिंक्य रहाणे यासर्वांना अपवाद ठरलाय. पाडगावकरांच्या ओळींसारखी अजिंक्य आणि राधिका यांची लव्हस्टोरी….तुमच्या आमच्यासारखी सेमच आहे.

सध्या अजिंक्य ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यने उत्तम पद्धतीने संघाची जबाबदारी सांभाळली आहे. गेली काही वर्ष अजिंक्यच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो. परंतू काळ खडतर असो किंवा चांगला प्रत्येक वेळी अजिंक्यची बायको राधिका त्याच्यासोबत सावलीसारखी असते. अगदी तुमच्या आमच्यासारखीच असलेली अजिंक्य-राधिकाची मराठमोळी लव्हस्टोरी एकदम आदर्शवत आहे.

अजिंक्य आणि राधिका हे लहानपणापासूनचे मित्र…या दोघांची मैत्री कॉलेजपर्यंत कायम राहिली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे कळलंच नाही. मुळचा अहमदनगरचा असलेला रहाणे लहानपणी डोंबिवलीत रहायचा. लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या अजिंक्यने टीम इंडियाकडून खेळण्याचं स्वप्न बाळगलं होतं. राधिकानेही एका उत्तम जोडीदाराप्रमाणे अजिंक्यची साथ दिली. दोघंही प्रेमात पडल्यानंतर त्यांनी आपल्या घरच्यांना याची कल्पना दिली. मुंबईच्या संघाकडून स्थानिक क्रिकेट, रणजी अशा स्पर्धांमधून अजिंक्यने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आणि त्याच्यासाठी भारतीय संघाची दारं उघडली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

२६ सप्टेंबर २०१४ रोजी अजिंक्य आणि राधिका विवाहबंधनात अडकले. अजिंक्यच्या लग्नातला एक मजेशीर किस्सा त्याने एका कार्यक्रमात शेअर केला होता. रहाणे आपल्या लग्नाच्या दिवशी नेहमीप्रमाणे टी-शर्ट आणि जिन्स पँटवर राधिकाच्या घरी पोहचला होता. लग्नाच्या दिवशी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला अशा अवतारात पाहून राधिका चांगलीच भडकली होती. यानंतर अजिंक्यने लगेचच कपडे बदलत लग्नाचा पेहराव घातला आणि राधिका शांत झाली. आपल्या आयुष्यातली ही सर्वात मोठी चूक असल्याचं अजिंक्यने सांगितलं होतं.

मात्र यानंतर दोघांचंही आयुष्य अगदी फिल्मी आणि रोमँटीक राहिलं आहे. २०१९ मध्ये अजिंक्य बाबा बनला…पत्नीच्या डोहाळेजेवणाचा फोटो पोस्ट करत अजिंक्यने खास मराठमोळ्या शैलीत ही बातमी चाहत्यांना दिली होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये राधिका आणि अजिंक्यने एका गोंडस मुलीला जन्म दिला…अजिंक्य आणि राधिकाने आपल्या मुलीचं नाव आर्या ठेवलं आहे.

ADVERTISEMENT

मुलीच्या जन्मानंतर अजिंक्यचं आयुष्य बदलून गेलं. क्रिकेटच्या सरावाव्यतिरीक्त मुलीला खेळवणं, झोपवणं, ते बायकोला स्वयंपाक घरात मदत करणं अशी एखाद्या चांगल्या नवऱ्याची सर्व कामं अजिंक्य पार पडतोय. सामना आयपीएलचा असो किंवा आंतरराष्ट्रीय राधिकाही प्रत्येक सामन्यात त्याच्यासोबत असते. मध्यंतरी काही सामन्यांत अजिंक्यला खराब कामगिरीमुळे टीका सहन करावी लागली. यानंतर मेलबर्न कसोटीत शतकी खेळी करत त्याने आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं. या सर्व परिस्थितीत एक गोष्ट नेहमी कायम राहिली…अजिंक्यचा स्वतःवरचा विश्वास आणि राधिकाची भक्कम साथ…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT