T20 World Cup : भारताचं आव्हान अजुनही कायम, स्कॉटलंडवर ८ विकेट राखून मात

नेट रनरेटच्या निकषात भारताची बाजू वरचढ, न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्यावर ठरेल भवितव्य
T20 World Cup : भारताचं आव्हान अजुनही कायम, स्कॉटलंडवर ८ विकेट राखून मात
लोकेश राहुलचं विक्रमी अर्धशतकफोटो सौजन्य - BCCI

पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपमध्ये आपला दुसरा विजय मिळवला आहे. ८६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने हे लक्ष्य ६.३ ओव्हर्समध्ये पूर्ण करत आपलं आव्हान अजुनही कायम राखलं आहे. सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या ओव्हरपासून फटकेबाजी करत स्कॉटलंडला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. भारताने हा सामना ८ विकेटने जिंकला.

टॉस जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत स्कॉटलंडच्या डावाला खिंडार पाडायला सुरुवात केली. स्कॉटलंडकडून सलामीवीर जॉर्ज मुन्सी, मॅकलेओड, लेसक आणि वॅट या खेळाडूंनी दोन आकडी धावसंख्या गाठली. बाकीचे सर्व फलंदाज भारताच्या आक्रमणासमोर तग धरु शकले नाहीत. भारताकडून मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी ३-३ तर जसप्रीत बुमराहने २ आणि रविचंद्रन आश्विनने १ विकेट घेतली.

नेट रनरेटच्या निकषात आपलं आव्हान कायम राखण्यासाठी भारताला ८६ धावांचं आव्हान ७.१ ओव्हर्समध्ये पूर्ण करायचं होतं. भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोन्ही सलामीवीरांनी स्कॉटलंडच्या बॉलर्सची धुलाई करायला सुरुवात केली. मैदानात चौफेर फटकेबाजी करत भारतीय सलामीवीरांनी ५ ओव्हरमध्ये भारताला ७० धावांचा टप्पा गाठून दिला. रोहित आणि लोकेश राहुल ही जोडी भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच व्हेलने रोहित शर्माला माघारी धाडलं.

रोहित शर्माने १६ बॉलमध्ये ५ फोर आणि १ सिक्स लगावत ३० धावा केल्या. परंतू यानंतर लोकेश राहुलने मिळालेली लय न गमावता फटकेबाजी सुरुच ठेवली. महत्वाची इनिंग खेळत लोकेश राहुलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. १८ चेंडूंत राहुलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. युवराज सिंगनंतर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा राहुल दुसरा भारतीय खेळाडू ठरला. सहाव्या ओव्हरमध्येच सामना संपवण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुल आऊट झाला. वॅटने त्याला ५० रन्सवर आऊट केलं. आपल्या अर्धशतकी खेळीत राहुलने ६ फोर आणि ३ सिक्स लगावल्या. यानंतर सूर्यकुमार यादवने विजयी षटकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in