अखेर विनोद कांबळीला मिळाली नोकरी, आर्थिक अडचणीत असलेल्या खेळाडूला मराठी उद्योजकाचा मदतीचा हात
भारताचा माजी क्रिकेटर आक्रमक फलंदाज विनोद कांबळी मागच्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्याला नोकरीची गरज असल्याचं त्याने सांगितलं होतं. अखेर त्याला नोकरी मिळाली आहे. सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीत त्याला 1 लाख रुपये महिन्याची पगार असलेली नोकरी मिळाली आहे. कंपनीचे चेअरमन संदीप थोरात यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला ऑफर लेटर दिले. त्याने थोरात […]
ADVERTISEMENT

भारताचा माजी क्रिकेटर आक्रमक फलंदाज विनोद कांबळी मागच्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्याला नोकरीची गरज असल्याचं त्याने सांगितलं होतं. अखेर त्याला नोकरी मिळाली आहे. सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीत त्याला 1 लाख रुपये महिन्याची पगार असलेली नोकरी मिळाली आहे. कंपनीचे चेअरमन संदीप थोरात यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला ऑफर लेटर दिले. त्याने थोरात यांची ऑफर स्वीकारली असल्याचं त्यांनीच सांगितलं. आता भारताचा माजी क्रिकेटपटू या कंपनीच्या मुंबई शाखेत मानद संचालक म्हणून काम पाहणार आहे.
काही दिवसांपूर्वी आर्थिक विवंचनेत असल्याची दिली होती माहिती
एकेकाळी विनोदी कांबळी हा भारताचा स्फोटक फलंदाज राहिलेला आहे. त्याची कारकीर्द जरी छोटीशी राहिली असली तरी ती उल्लेखनीय होती. कांबळी नेहमी चर्चेत असायचा. त्यामुळे कधीकाळी लाखो रुपये कमावणारा कांबळी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन, ही त्याचे घर चालवण्याचे एकमेव साधन उरले आहे. जे मुंबईसारख्या ठिकाणी राहताना कमी पडत आहे, असं त्याने स्वतः सांगितले होते. त्यामुळे आपल्याला नोकरीची गरज असल्याचं त्याने मिड डेशी बोलताना सांगितले होते.
सचिनला आहे माझ्या परिस्थितीची जाणीव : कांबळी
क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन आणि विनोद कांबळीने क्रिकेटची सुरुवात सोबत केली होती. दोघांनी शालेय जीवनापासून आपल्या खेळाची सुरुवात करून सर्वांना आकर्षित केले होते. रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी क्रिकेटचे धडे गिरवले होते. लहानपणापासून सचिन आणि कांबळी चांगले मित्र राहिले आहेत. सचिनला माझ्या स्थितीची जाणीव आहे, परंतु सचिनने मला खूप मदत केली असल्याने त्याच्याकडून कोणतीही आशा बाळगत नाही, असं कांबळी म्हणाला होता.
संदीप थोरात यांनी दिली 1 लाख रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर
विनोद कांबळी हा हलाखीचे जीवन जगत असून त्याला कामाची गरज आहे, अशी माहिती मिळताच एक मराठी उद्योजक त्याच्या मदतीसाठी पुढे आला होता. अहमदनगरचे उद्योजक संदीप थोरात यांनी ही ऑफर दिली होती. माझ्या फायनान्स कंपनीच्या मुंबईमध्ये १० ब्रँच होत आहेत. विनोद कांबळी हे फायनान्समधील नसले तरी क्रिकेट हा असा विषय आहे की, त्यात मायक्रो मॅनेजमेंट चालते. याच मायक्रो मॅनेजमेंटचा वापर या ब्रँचच्या व्यवस्थापनासाठी करता येईल. क्रिकेटमध्ये ज्या शिस्तीने काम चालते तीच शिस्त ते या कंपनीमध्ये लावू शकतात, असे मला वाटते. म्हणून मी त्यांना एक लाख रुपये पगाराची ऑफर मुंबईमध्ये करणार आहे, असे थोरात यांनी सांगितले होते. त्यानंतर आता विनोद कांबळीने ही जॉब ऑफर स्वीकारली आहे.