Mumbai News: या महिन्यातच म्हणजेच सप्टेंबरमध्ये मुंबई मेट्रो लाइन 4 वर ट्रायल सुरू होणार असणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो लाईन 4 च्या पहिल्या टप्प्यासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधकामाचे सुमारे 60 टक्के काम पूर्ण केलं आहे. MMRDA ने 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. यापैकी 6.9 किमी लांबीच्या मार्गावर गर्डर आणि प्रीकास्ट सेगमेंटसह एलिव्हेटेड व्हायाडक्टचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
'एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
मेट्रो लाईन 4 म्हणजेच ग्रीन लाईन कासारवडवली आणि वडाळा दरम्यान धावेल. मेट्रो 4 ही 32.32 किमी तर मेट्रो 4 अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे आणि यादरम्यान, एकूण 32 स्थानके असतील. या लाईनवर प्रवास सुरू झाल्यानंतर मुंबई आणि ठाण्याच्या पूर्व आणि मध्य भागातील प्रवाशांना सुविधा मिळेल. 'एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायमुख आणि कॅडबरी जंक्शन दरम्यान 10 स्थानके असलेल्या 10.5 किलोमीटर लांबीच्या या मार्गाची तयारी सुरू आहे. हाच मार्ग सर्वात आधी प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.
अद्याप किती काम पूर्ण?
या एलिव्हेटेड कॉरिडोरच्या निर्मितीचं जवळपास 60 टक्के काम पूर्ण झालं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन आणि कासारवडवली या सहा स्थानकांदरम्यान पुलाचे बांधकाम पूर्ण झालं आहे.
हे ही वाचा: Govt Job: 10 वी पास तरुणांसाठी गुप्तचर विभागात नोकरीची संधी... 'या' पदांसाठी आत्ताच करा अप्लाय!
पहिल्या टप्प्याचं 60 टक्के काम पूर्ण
सोमवारी, एमएमआरडीएने या मार्गावर शेवटचा गर्डर पूल बसवला. या 10.5 किमी लांबीच्या मार्गावरील बहुतेक भागांवर ट्रॅक बसवण्याचं काम देखील पूर्ण झालं आहे. कॉरिडोरवर विद्युतीकरणाचं काम अद्याप सुरू असून यातील 4.6 किमी भागातील विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे.
ओव्हरहेड वायर्सचं ट्रायल सुद्धा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. ट्रायलच्या तयारीसाठी, क्रेनच्या मदतीने सहा डब्यांची मेट्रो ट्रेन एलिव्हेटेड ट्रॅकवर चालवण्यात आली आहे. परंतु, ट्रायलसाठी विशेष ठरवण्यात आलेला कारशेड अद्याप बांधलेला नाही.
हे ही वाचा: "लग्न करेन तर दाजींसोबतच..." मेहुणीने धरला हट्ट, नंतर मोठ्या बहिणीच्या निर्णयाने सर्वांनाच बसला धक्का
डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य
शेडचं काम पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये ट्रायल सुरू होणार असल्याची माहिती आहे. तसेच, प्रवाशांच्या सेवेसाठी अंतिम मंजूरी मिळाल्याआधी अधिकाऱ्यांकडून मार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने तपास केला जाईल आणि त्यानंतरच हा मार्ग कार्यान्वित करण्याची परवानगी दिली जाईल. सरकारने डिसेंबरपर्यंत मेट्रोचा हा मार्ग सुरू करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.
ADVERTISEMENT
