Mumbai Crime: मुंबईत एका 72 वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्याकडून 32.8 लाख रुपये उकळल्याची बातमी समोर आली आहे. आरोपींनी स्वत: पोलीस अधिकारी असल्याचं सांगून वृद्ध महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती आहे. संबंधित प्रकरण हे मुंबईतील मुलुंड परिसरातील असल्याचं वृत्त आहे. आरोपींनी स्वत: 'कोलाबा क्राइम ब्रांच'चे अधिकारी असल्याचं खोटं सांगून पीडितेला आणि पतीला एका 'मनी लॉन्ड्रिंग' केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.
ADVERTISEMENT
क्राइम ब्रांचचा अधिकारी असल्याचं खोटं सांगितलं अन्...
पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिलेच्या पतीला एक फोन आला आणि त्याने स्वत: कोलाबा क्राइम ब्रांचचा अधिकारी असल्याचं सांगितलं. न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, फोनवर बोलत असताना आरोपीने दावा केला की, पीडित जोडप्याच्या बँक अकाउंमधील 2.5 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित ट्रान्झेक्शन करण्यात आले आहेत आणि यासाठी जवळपास 25 लाख रुपये कमीशन म्हणून जमा झाले आहेत. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने कुटुंबियांची माहिती मागितली आणि कोणालाच या प्रकरणाबाबत न सांगण्याची ताकीद दिली. कोणालाही याबद्दल सांगितल्यास त्यांना अटक होऊ शकत असल्याची धमकी सुद्धा आरोपींनी दिली.
दुसऱ्या दिवशी, आणखी एका आरोपीने पोलीस अधिकाऱ्याच्या युनिफॉर्ममध्ये पीडित जोडप्याला व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी, महिलेने फसवणूक करणाऱ्याला सांगितलं की, त्यांच्या बँकमध्ये जवळपास 37 लाख रुपये असून लॉकरमध्ये काही दागिने ठेवले आहेत. त्यानंतर, आरोपींनी तपासाच्या बहाण्याने पीडितांच्या बँक खात्यामधील 32.8 लाख रुपये त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितलं. अधिकाऱ्यांच्या भितीमुळे, महिला गोंधळलेल्या अवस्थेत बँकमध्ये गेली आणि आरटीजीएसच्या माध्यमातून तिच्या खात्यातील सगळी रक्कम ट्रान्सफर केली. तिने त्याची पेमेन्ट स्लिपसुद्धा व्हॉट्सअॅपवर पाठवली.
हे ही वाचा: सहा मुलं झाली, सुखाचा संसार सुरु असताना दुसऱ्या पुरुषावर जडला जीव, दुसरं लग्न करण्यासाठी मागे लागली अन्...
महिलेने पोलिसात केली तक्रार
काही तासांनंतर, पीडित महिलेने तिच्या जावयाला या घटनेची माहिती दिली. यावर तिच्या जावयाने लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्यास सांगितलं. त्यानंतर, पीडिता मुलुंड ईस्ट रीजन सायबर सेलमध्ये पोहोचली आणि संपूर्ण घटनेची तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, प्राथमिक तपासावरून ही सायबर फ्रॉडचं प्रकरण असल्याचं स्पष्ट होत आहे. यामध्ये, वृद्ध महिला आणि पतीला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन त्यांची मोठी फसवणूक करण्यात आली.
हे ही वाचा: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या, दु:खद घटनेनंतर पंकजा ताईंचा बीड दौरा रद्द
सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये फसवणूक करणारे आरोपी बऱ्याचदा पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करतात, व्हिडिओ कॉलमध्ये बनावट वर्दी घालतात आणि पीडितांमध्ये भीती निर्माण करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात. पोलिसांनी बँक खाते आणि मोबाईल नंबर ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ADVERTISEMENT











