राजगुरुनगर हादरलं, शिक्षक शिकवत असताना दहावीतील पुष्कराजचा गळा चिरला, खासगी क्लासमध्ये लहान मुलांचे गँगवॉर

Rajgurunagar Crime News : क्लासमेट असलेल्या प्रयाग सोमनाथ मांजरे याने पुष्कराज दिलीप शिंगाडे या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच प्रसंग भयावह बनला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना काही समजण्याच्या आतच पुष्कराज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

Rajgurunagar Crime News

Rajgurunagar Crime News

मुंबई तक

15 Dec 2025 (अपडेटेड: 15 Dec 2025, 11:31 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजगुरुनगर हादरले, शिक्षक शिकवत असताना मुलाचा गळा चिरला,

point

खासगी क्लासमध्ये लहान मुलांचे गँगवॉर

Rajgurunagar Crime News , राजगुरुनगर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये भल्या सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. खासगी शिकवणी वर्गात शिक्षक शिकवत असतानाच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमधील वादाने हिंसक वळण घेतले आणि एका विद्यार्थ्याचा चाकूने गळा चिरण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाळा-क्लासमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

राजगुरुनगरमधील एका खासगी क्लासमध्ये सकाळच्या सत्रात दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता. शिक्षक धडा शिकवत असतानाच अचानक वर्गात गोंधळ उडाला. क्लासमेट असलेल्या प्रयाग सोमनाथ मांजरे याने पुष्कराज दिलीप शिंगाडे या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच प्रसंग भयावह बनला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना काही समजण्याच्या आतच पुष्कराज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

घटनेनंतर क्लासमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमी अवस्थेत पुष्कराजला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना तगडा धक्का, तेजस्वी घोसाळकरांनी साथ सोडली

हल्ल्यानंतर आरोपी विद्यार्थी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अल्पवयीन मुलांमध्ये ‘गँगवॉर’सदृश मानसिकता कशी तयार होते, हा गंभीर प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे. मैत्री, स्पर्धा, सोशल मीडियावरील प्रभाव की वैयक्तिक वाद—नेमका कोणता धागा या हत्येमागे आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्लासमधील शिक्षक, विद्यार्थी आणि व्यवस्थापनाकडून माहिती घेण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दोन्ही मुले अल्पवयीन असून दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याची अधिकृत नोंद आहे. मयत पुष्कराज दिलीप शिंगाडे (रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) तर आरोपी प्रयाग सोमनाथ मांजरे (रा. मांजरेवाडी, ता. खेड, जि. पुणे) अशी ओळख समोर आली आहे.

या घटनेनंतर खासगी क्लासमधील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वर्गात धारदार शस्त्र कसे पोहोचले, प्रवेश तपासणी का नव्हती, शिक्षकांच्या उपस्थितीत इतकी गंभीर घटना कशी घडली—असे अनेक सवाल पालक विचारत आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ अभ्यासक्रम नाही, तर विद्यार्थ्यांच्या वर्तनावर, समुपदेशनावर आणि सुरक्षिततेवरही भर देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, पोलीस या प्रकरणात पुढील कारवाई करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. अल्पवयीन असल्याने प्रकरण बाल न्याय कायद्यांतर्गत हाताळले जाण्याची शक्यता आहे. एका खासगी क्लासमध्ये घडलेल्या या रक्तरंजित घटनेने राजगुरुनगरच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवून टाकले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

दोन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या जालन्यातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली

    follow whatsapp