मिल्कशेकमध्ये 5 हजारांचं विष, पोलीस पित्याला पोलीस मुलीनं पोलिस प्रियकराच्या मदतीनं संपवल्याची A टू Z स्टोरी!

Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार 3 वर्षांनंतर उघडकीस आला आहे. प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे दूधशार्करेत विष देऊन हा कट रचण्यात आला होता.

Chandrapur Crime

Chandrapur Crime

मुंबई तक

• 02:37 PM • 27 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मिल्कशेकमध्ये 5 हजारांचं विष

point

पोलीस पित्याला पोलीस मुलीनं पोलिस प्रियकराच्या मदतीनं संपवल्याची A टू Z स्टोरी!

Chandrapur Crime, विकास राजूरकर : चंद्रपूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. एका पोलीस तरुणीनेच आपल्या वडिलांचा काटा काढल्याचे तब्बल 3 वर्षांनंतर उघड झाले असून या प्रकरणाने संपूर्ण पोलीस दल हादरले आहे. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली असून, यात खुद्द मृताची मुलगी आणि तिचा पोलीस दलातील प्रियकर यांचा समावेश आहे. हेड कॉन्स्टेबल जयंत बाल्लावार यांची हत्या त्यांच्याच मुलीने, आर्या बाल्लावार हिने प्रियकर आशिष शेडमाके याच्या मदतीने केली होती. ही भीषण घटना 25 एप्रिल 2023 रोजी घडली होती, परंतु या गुन्ह्याचा खरा उलगडा 23 मार्च 2026 रोजी झाला आहे. पोटच्या मुलीने केवळ प्रेमप्रकरणासाठी वडिलांचा बळी घेतल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : महाराष्ट्र हादरला! वर्दीमागचं रक्तरंजित रहस्य, मुलीनेच घडवून आणली पोलीस बापाची हत्या; प्रियकराने 3 वर्षांनी उघड केला कट

प्रेमप्रकरणातून रचला मृत्यूचा सापळा

या प्रकरणातील मुख्य आरोपी आर्या आणि आशिष यांचे प्रेमसंबंध होते, मात्र आर्याचे वडील जयंत बाल्लावार यांना या संबंधांची कुणकुण लागली होती. वडिलांनी याला कडाडून विरोध केला आणि यावरून आर्याला अनेकदा मारहाणही केली होती. वडिलांचा हा विरोध आपल्या प्रेमात अडथळा ठरत असल्याचे पाहून या प्रेमी युगुलाने त्यांचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. विष मिळवण्यासाठी आशिषने आपल्या मावशीच्या मुलामार्फत चैतन्य गेडाम याच्याशी संपर्क साधला. चैतन्यने 5,000 रुपयांच्या बदल्यात एका काचेच्या बाटलीत घातक विष आणून दिले. 25 एप्रिल 2023 रोजी आर्याने संधी साधून आपल्या वडिलांना मिल्कशेक मधून हे विष पाजले. मिल्कशेक पिल्यानंतर काही वेळातच ड्युटीवर असताना जयंत बाल्लावार यांना चक्कर आली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता, परंतु आर्याने खोटा जबाब देऊन सर्वांची दिशाभूल केली होती.

हेही वाचा : बीड : 'तसले' व्हिडीओ पाहून 15 वर्षांचा मुलगा सैतान बनला, दोन वर्षांच्या चिमुरडीवर केला अत्याचार; शेवटी हौदात...

भांडणामुळे फुटले 3 वर्षांचे गुपित

या गुन्ह्याचा उलगडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्या आणि आशिष यांच्यातील बिनसलेले संबंध ठरले आहेत. हत्या केल्यानंतर हे दोघेही वर्ष 2025 मध्ये चंद्रपूर पोलीस दलात अधिकृतपणे भरती झाले आणि त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. या सततच्या वादाला कंटाळून आणि भीतीपोटी आशिष शेडमाके याने स्वतःच रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन या हत्येची कबुली दिली. सुरुवातीला पोलिसांनी या अर्जाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते, परंतु जेव्हा 3 वर्षांपूर्वीच्या मर्ग रिपोर्टचे आणि वैद्यकीय अहवालाचे पुनरावलोकन केले गेले, तेव्हा जयंत बाल्लावार यांचा मृत्यू विषप्रयोगामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपी महिला पोलीस असल्याने सुरुवातीला चौकशीत गांभीर्य दाखवले गेले नाही, अन्यथा हा गुन्हा 3 वर्षांपूर्वीच उघडकीस आला असता, अशी चर्चा आता रंगत आहे.

रामनगर पोलिसांनी याप्रकरणी आशिष शेडमाके, आर्या बाल्लावार, चैतन्य गेडाम आणि एका विधिसंघर्ष बालकावर भादंवि कलम 302, 120 (ब), 201 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या चारही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वडिलांच्या हत्येनंतरही दोन वर्षे आरामात पोलीस दलात सेवा देणाऱ्या या आरोपींचे सत्य समोर आल्याने खाकी वर्दीची प्रतिमा मलिन झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दराडे करत असून, या हत्येमागे आणखी कोणाचे सहकार्य होते का, याचाही शोध घेतला जात आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बीड : 'तसले' व्हिडीओ पाहून 15 वर्षांचा मुलगा सैतान बनला, दोन वर्षांच्या चिमुरडीवर केला अत्याचार; शेवटी हौदात...