Maharashtra rain low pressure area : महाराष्ट्रातील पावसाची स्थिती सध्या काहीशी शांत आहे. गेल्या 48 तासांत राज्यात फारसा पाऊस झालेला नाही. मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता पुढे सरकत मध्य प्रदेशात पोहोचले आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम मध्य प्रदेशासोबतच आसपासच्या राज्यांमध्येही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या नैऋत्य मोसमी वारे सक्रिय असले तरी त्यांचा वेग फारसा नाही. तसेच अरबी समुद्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले नसल्याने महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची स्थिती दिसत नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नऊ वर्षांच्या मुलीवर भावासमोर लैंगिक अत्याचार, अखेर कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार
‘फेअरली वाईड स्प्रेड टू वाईड स्प्रेड रेनफॉल’
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात 20 ते 22 ऑगस्टदरम्यान काही ठिकाणी तुरळक ते विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 ऑगस्टलाही अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. मात्र 23 ऑगस्ट हा दिवस विदर्भासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या दिवशी विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याला ‘फेअरली वाईड स्प्रेड टू वाईड स्प्रेड रेनफॉल’ असा अंदाज देण्यात आला आहे. म्हणजेच विदर्भातील अनेक भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे. याआधी 20 आणि 21 ऑगस्टला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात. मात्र हा अतिमुसळधार पावसाचा इशारा नाही.
हेही वाचा : शिंदेंच्या हातून धनुष्यबाण सुटणार की राहणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणी जशीच्या तशी
महाराष्ट्रासाठी विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही
पुढील 48 तासांचा अंदाज पाहिल्यास, 21 ऑगस्टला जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि हिंगोली या भागांसाठी थंडरस्टॉर्मची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासोबत हलक्या पावसाच्या सरी आणि वादळी वारे होऊ शकतात. 21 ऑगस्टला उर्वरित महाराष्ट्रासाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. 22 ऑगस्टला लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यांसाठी थंडरस्टॉर्मची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांतही हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. मात्र पुढील दोन दिवसांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. तसेच रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्टही सध्या देण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीत सरासरीच्या सुमारे 85 टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसाठी योग्य नियोजन करणे आणि पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे असल्याचे या अंदाजातून अधोरेखित होत आहे. सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता निर्माण झाली असली, तरी पुढील 48 तासांत मोठ्या पावसाची स्थिती दिसत नाही. विदर्भात मात्र 23 ऑगस्टला अनेक ठिकाणी मध्यम पाऊस होण्याची शक्यता असल्याने या दिवसाच्या हवामानाकडे विशेष लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












