ahmedabad crime news : अहमदाबादच्या शाहीबाग परिसरातील एका विवाहित महिलेने सासरी झालेल्या कथित छळाबाबत गंभीर आरोप करत महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नवऱ्याने बायकोला अश्लील व्हिडिओ दाखवले, नंतर अनैसर्गिक कृत्य केलं अन्..
महिलेच्या आरोपांनुसार, तिचा पती तिला जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ दाखवत असे. त्यानंतर त्याच पद्धतीने अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. याशिवाय विरोध केल्यास मारहाण केली जात असल्याचाही आरोप तिने केला आहे. गर्भधारणेदरम्यानही पतीने तिला लाथ मारून गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर महिला पोलीस ठाणे गाठून आपली व्यथा मांडली असून, पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : मुंबईची खबर : कर्मचाऱ्यांच्या संपानतर 'बेस्ट'ने घेतला मोठा निर्णय
लग्नानंतर सासू आणि दीराचे सततचे हुंड्यावरून टोमणे
तक्रारीनुसार, पीडित महिलेचा विवाह 2011 मध्ये झाला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच सासरी तिच्याशी गैरवर्तन सुरू झाले. लग्नापूर्वी पतीचे यापूर्वीही लग्न झाले होते आणि त्याला एक मूल असल्याची माहिती सासरच्या मंडळींनी लपवून ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. लग्नानंतर सासू आणि दीर यांनी हुंड्यावरून टोमणे मारण्यास सुरुवात केली. गर्भवती असतानाही तिला पुरेशी विश्रांती न देता घरातील जड कामे करायला लावली जात होती. मुलीचा जन्म झाल्यानंतरही पतीचे वर्तन बदलले नाही. तो अनेकदा उशिरा घरी येत असे, पार्ट्यांना जात असे आणि पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
"तू आमच्या मुलाला आवडत नाहीस"
महिलेने पुढे असा आरोप केला आहे की, ती आजारी असतानाही पती तिला उत्तेजना वाढवणारी औषधे देऊन संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत असे. नकार दिल्यास तिच्यावर मारहाण केली जात होती. दुसऱ्यांदा गर्भधारणा झाल्यानंतर पतीने गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. तसे न केल्यास घटस्फोट देण्याची धमकीही दिली. या सततच्या छळामुळे महिला माहेरी गेली होती. मात्र पती तेथे जाऊन तिला जबरदस्तीने पुन्हा सासरी घेऊन आला. त्यानंतरही सासू आणि दीर तिचा अपमान करत होते. "तू आमच्या मुलाला आवडत नाहीस, समाजामुळे तुला ठेवावे लागत आहे. तू आमचे घर उद्ध्वस्त केले आहेस. घटस्फोट घेऊन निघून जा," असे टोमणे दिल्याचा आरोपही तिने केला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, एका रात्री तिने आपल्या पतीला परदेशातील काही महिलांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहिले. त्यानंतर तो त्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून त्याच प्रकारे संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतरही सासरच्या मंडळींचे वर्तन बदलले नाही. पतीच्या कथित संबंधांची माहिती सासूला दिल्यानंतर वाद झाला आणि तिला घराबाहेर काढण्यात आले, असा आरोपही तिने केला आहे. पाच महिने माहेरी राहिल्यानंतर ती पुन्हा सासरी परतली, मात्र त्यानंतरही पतीने अश्लील व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक संबंधांसाठी दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद आहे. नंतर तिला आणि तिच्या तिन्ही मुलींना वेगळ्या घरात पाठवण्यात आले, तर पती स्वतंत्र राहू लागला. तसेच, आमच्याविरोधात कोणतीही तक्रार किंवा अर्ज केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीनंतर महिला पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












