Crime News : बंगळुरुच्या ग्रामीण भागातील शिवगंगे हिलवर सोलो ट्रेकसाठी गेलेल्या 31 वर्षीय टेक प्रोफेशनल अद्वैत उपाध्याय यांचा शोध अद्याप सुरू आहे. अद्वैत 7 ऑगस्ट रोजी शिवगंगे हिलवर पोहोचले होते. त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. आता शोधमोहीमेदरम्यान ड्रोनच्या माध्यमातून दाट झुडपांमध्ये मानवी शरीरासारखी एक वस्तू दिसून आली आहे. मात्र, ही वस्तू अद्वैत यांचा मृतदेहच आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. त्यामुळे अद्वैत यांच्या कुटुंबीयांसह शोध पथकाची चिंता वाढली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बिग फॅन म्हणत सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी यांची कोणासोबत भेट घालून दिली? VIDEO
CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?
अद्वैत हे IITचे माजी विद्यार्थी असून सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल म्हणून काम करतात. ते व्हाइटफिल्डमधील एका फायनान्स फर्ममध्ये कार्यरत असून कडुगोडी येथे राहतात. पोलिसांच्या माहितीनुसार, CCTV फुटेजमध्ये 7 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 7.30 वाजता अद्वैत शिवगंगे येथे पोहोचल्याचे आणि ट्रेक सुरू केल्याचे दिसून आले. त्यांना दुपारपर्यंत परतण्याची अपेक्षा होती, मात्र ते परतले नाहीत. अद्वैत यांनी शिवगंगे येथे जाण्यासाठी मोटरसायकल भाड्याने घेतली होती. ही मोटरसायकल नंतर डोंगराच्या पायथ्याशी उभी असलेली आढळली, मात्र अद्वैत यांचा तेथे कोणताही ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल फोनचा शेवटचा सिग्नल कुनिगल रोडवरील कुड्डुरु परिसरात ट्रेस केला. हा परिसर शिवगंगेच्या सामान्य ट्रेकिंग मार्गापासून वेगळा असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर जरांगेंना वापरायला दिली, टीकेनंतर मालक समोर, सगळं बोलले...
मानवी शरीरासारखी दिसणारी वस्तू आढळली
यानंतर अद्वैत यांचा मोबाईल फोन बंद झाला. मोबाईल बंद झाल्यानंतर पोलिस आणि रेस्क्यू एजन्सींनी शोधमोहीम अधिक तीव्र केली. याचदरम्यान ड्रोन पथकांना धोकादायक शंतला ड्रॉपच्या खाली दाट झुडपांमध्ये मानवी शरीरासारखी दिसणारी वस्तू आढळली. शंतला ड्रॉप हा डोंगराचा अत्यंत उंच आणि कठीण भाग असून तेथे पोहोचणे सोपे नाही. ड्रोनमधून मिळालेल्या माहितीनंतर अद्वैत यांच्यासोबत अपघात झाला असावा किंवा ते डोंगरावरून खाली पडले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप त्यांची ओळख निश्चित झालेली नाही. दाट जंगल आणि कठीण भूप्रदेशामुळे रेस्क्यू टीमला ड्रोनने वस्तू दिसलेल्या अचूक ठिकाणीही अद्याप पोहोचता आलेले नाही.
अद्वैत यांच्या शोधासाठी पोलीस, NDRF, SDRF आणि वन विभागाचे सुमारे 100 कर्मचारी अभियानात सहभागी झाले आहेत. अनेक ड्रोन पथकांसोबत ग्राउंड टीमलाही तैनात करण्यात आले आहे. शिवगंगे हिल, शंतला ड्रॉप आणि आसपासच्या परिसरात सातत्याने शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडून अद्वैत बेपत्ता होण्यापूर्वीच्या त्यांच्या हालचालींचाही तपास केला जात आहे. त्यांच्या डिजिटल अॅक्टिव्हिटीवरही लक्ष केंद्रित करण्यात आले असून, त्यांच्या लॅपटॉपमधील ब्राउझिंग हिस्ट्री तपासली जात आहे. त्यामध्ये शिवगंगे, शंतला ड्रॉप आणि बेंगळुरू परिसरातील आत्महत्येशी संबंधित ठिकाणांबाबत सर्च केल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या सर्चच्या आधारे पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. अद्वैत यांनी स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला होता, असेही तपास यंत्रणांनी अद्याप निश्चित केलेले नाही. सध्या पोलिसांचे मुख्य लक्ष अद्वैत यांचा शोध घेणे आणि ड्रोनमधून दिसलेल्या वस्तूची ओळख निश्चित करण्यावर आहे.
ADVERTISEMENT












