Crime News : बिहारमधील पूर्णिया येथे एका बँक कर्मचाऱ्याने आपल्या दोन मुलांसमोर शिक्षिका पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शालिनी कुमारी (वय 34) असं मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या माध्यमिक विद्यालयात कार्यरत होत्या. शालिनी यांचे पती राजकुमार यादव हे पूर्णियातील को-ऑपरेटिव्ह बँकेत कार्यरत आहेत. ही घटना पूर्णिया जिल्हा मुख्यालयातील खजांची हाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणु नगर येथे घडली. हत्येनंतर राजकुमार यादव घटनास्थळावरून फरार झाला. घटनेच्या वेळी त्यांची 4 आणि 9 वर्षांची दोन मुले घरातच उपस्थित होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा : गळ्याभोवती तार गुंडाळून बलात्कार, सेक्युरिटी गार्डचं विद्यार्थीनीसोबत क्रूर कृत्य
जमिनीच्या पैशावर पती-पत्नीमध्ये सुरु होता वाद
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, शालिनी आणि राजकुमार यांच्यात विविध कारणांवरून वारंवार वाद होत होते. रविवारी संध्याकाळीदेखील दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद त्यांनी एकत्र खरेदी केलेल्या जमिनीवरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जमिनीत राजकुमारने गुंतवलेल्या आपल्या हिस्स्याचे पैसे तो शालिनीकडे परत मागत होता. मात्र, शालिनी ही रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे सांगत होती. या मुद्द्यावरून दोघांमधील वाद वाढला. त्यानंतर राजकुमारने मुलांसमोरच शालिनीला मारहाण केली आणि घराबाहेर निघून गेला. मोठ्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, घरातून जाताना राजकुमारने ‘आज कहानी ही खत्म कर देते हैं’ असे म्हटले होते.
हेही वाचा : पुणे : एअरफोर्स जवान म्हणून थाटात फिरायचा, टेलरच्या दुकानी गेला पुरता फसला
पोटच्या लेकरांदेखत आईला संपवलं
रविवारी रात्री सुमारे आठ वाजल्यानंतर राजकुमार पुन्हा घरी आला. त्यावेळी मुले घरात अभ्यास करत होती, तर शालिनी स्वयंपाक करत होती. राजकुमारने मुलांसमोरच शालिनीवर गोळी झाडली आणि त्यानंतर घरातून फरार झाला. गोळीबारानंतर 9 वर्षांच्या मुलाने त्याचे मामा विक्रम आनंद यांना व्हिडिओ कॉल करून वडिलांनी आईला गोळी मारल्याची माहिती दिली. त्यावेळी शालिनी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत होत्या. त्या वेदनेने विव्हळत आपल्या भावाला, ‘आता काय करणार, आम्हाला गोळी मारली आहे,’ असे म्हणाल्या. त्यानंतर कुटुंबीय आणि आसपासच्या नागरिकांनी शालिनी यांना तातडीने जीएमसीएचमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत मृतक महिलेचे मामा गौरी शंकर यांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून घरगुती वाद झाला आणि त्यातून राजकुमारने शालिनी यांच्या छातीत गोळी झाडली. सदर एसडीपीओ अभिनव पाराशर यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासानुसार हा घरगुती वादातून झालेल्या हत्येचा प्रकार असल्याचे दिसत आहे. घटनास्थळावरून गोळीचे खोकेही जप्त करण्यात आले आहेत. आरोपी पती अद्याप फरार असून सर्व बाबींचा तपास सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, तसेच त्याच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT












