pune fake air force jawan : पुण्यात पोलिसांनी भारतीय वायुसेनेचा बनावट जवान असल्याचे भासवणाऱ्या शुभम विलास अंबुरे (26) याला अटक केली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला शुभम पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात सलूनमध्ये काम करतो. मात्र, आपल्या गावात तो आपण भारतीय वायुसेनेत जवान असून तेथे नोकरी करत असल्याचे कथितपणे सांगत होता. स्वतःची ओळख आणि गावातील 'वजन' वाढवण्यासाठी त्याने ही बनावट ओळख तयार केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : हा ग्राऊंड रिपोर्ट डोळे उघडून बघायलाच हवा, इन्फ्रामॅन कुठे आहेत?
टेलरला विसंगती असल्याचा संशय अन् सगळं उघडकीस
शुभमचा हा बनाव पुण्यातील लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीमधील बालाजी टेलर्समध्ये उघडकीस आला. एअरफोर्सची वर्दी शिवून घेण्यासाठी तो टेलरकडे पोहोचला होता. आपण वायुसेनेत तैनात असल्याचे सांगत त्याने युनिफॉर्म शिवून देण्यास सांगितले. टेलरने त्याच्याकडे काही अधिक माहिती मागितली आणि ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. त्यानंतर शुभमने खिशातून एक ID कार्ड काढून टेलरला दाखवले. मात्र, कार्ड पाहिल्यानंतर टेलरला त्यामध्ये काहीतरी विसंगती असल्याचा संशय आला. यापूर्वीही एअरफोर्सच्या जवानांची वर्दी शिवताना टेलरने त्यांची ओळखपत्रे पाहिली होती. त्यामुळे त्याला शुभमच्या ओळखपत्राबाबत संशय आला आणि त्याने तातडीने लोहगाव पोलिसांना याची माहिती दिली.
हेही वाचा : 'चल, तुला क्लासपर्यंत सोडतो...' विद्यार्थीनीवर वाटेतच बलात्कार; तरुणाला अटक
2022 मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या जवानाच्या आयडीचा वापर
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि शुभमला ताब्यात घेतले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी शुभमची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने आपण भारतीय वायुसेनेत काम करत नसल्याचे कथितपणे मान्य केले. पोलिसांच्या माहितीनुसार, गावात आपली ओळख आणि रुतबा वाढवण्यासाठी त्याने स्वतःला एअरफोर्सचा जवान असल्याचे सांगितले होते. तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. शुभम ज्या एअरफोर्स जवानाच्या ओळखपत्राचा वापर करत होता, त्या जवानाचा 2022 मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत जवानाचे ओळखपत्र शुभमपर्यंत कसे पोहोचले आणि तो त्याचा वापर कधीपासून करत होता, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी एअरफोर्सच्या वतीने लोहगाव पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी शुभम अंबुरेला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बनावट एअरफोर्स जवान बनून त्याने कोणकोणत्या लोकांना आपली खोटी ओळख सांगितली, तसेच एअरफोर्सची वर्दी आणि मृत जवानाचे ओळखपत्र मिळवण्यासाठी त्याला अन्य कोणाची मदत झाली होती का, याचा तपास पोलिस करत आहेत.
ADVERTISEMENT












