आंतरजातीय विवाह केल्याचा राग, सूड उगवण्यासाठी भावानेच बहिणीचं कुंकू पुसलं; गावात येताच काटा काढला

मुंबई तक

30 Mar 2026 (अपडेटेड: 30 Mar 2026, 09:44 AM)

Crime News : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्याच सख्ख्या बहिणीच्या पतीची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली असून पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पालकांना ताब्यात घेतले आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आंतरजातीय विवाह केल्याचा राग

point

सूड उगवण्यासाठी भावानेच बहिणीचं कुंकू पुसलं; गावात येताच काटा काढला

Crime News : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एका भावाने आपल्याच सख्ख्या बहिणीचं कुंकू पुसल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. सिंहवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अस्थुआ गावात ही घटना घडली असून, आरोपीने आपल्या भाऊजीची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, जातीय द्वेषापोटी एका निष्पाप तरुणाचा नाहक बळी गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या आई-वडिलांनाही ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू केला आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातून ही माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

हे वाचलं का?

4-5 वर्षांचे प्रेमसंबंध आणि नंतर विवाह केला; पण भावाने भयंकर शेवट केला 

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत शंकर ठाकूर (वय 27 वर्षे) हा गावातीलच एका तरुणीच्या प्रेमात होता. त्यांचे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते, मात्र दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने मुलीच्या घरच्यांचा या नात्याला कडाडून विरोध होता. शंकर हा कोलकाता येथे कॅब चालक म्हणून काम करत होता आणि साधारण 20 दिवसांपूर्वी तो गावात परतला होता. त्याने आपल्या प्रेयसीला सोबत घेऊन कोलकाता गाठले आणि तिथे दोघांनी कायदेशीररित्या प्रेमविवाह केला. लग्नानंतर हे जोडपे सुमारे 1 आठवड्यापूर्वी पुन्हा आपल्या मूळ गावी परतले होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा या आंतरजातीय विवाहाला तीव्र विरोध होता आणि याच विरोधामुळे त्यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कट रचून बोलावले आणि केला जीवघेणा हल्ला

घटनेच्या दिवशी, म्हणजेच रविवारी रात्री उशिरा मुलीच्या धाकट्या भावाने, आलोक राय याने शंकरला फोन करून चर्चेसाठी बोलावले. शंकर जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा आलोकने त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. शंकरच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याला वाचवण्यासाठी शिवम कुमार हा तरुण धावून आला असता, आरोपीने त्याच्यावरही हल्ला केला, ज्यामध्ये शिवम गंभीर जखमी झाला आहे. आरोपी आलोक शंकरवर तोपर्यंत वार करत राहिला जोपर्यंत त्याचा मृत्यू झाला नाही. सध्या जखमी शिवमला उपचारासाठी DMCH रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी आलोक राय याच्यासह त्याचे वडील आणि आई यांना ताब्यात घेतले आहे. सदर एसडीपीओ एसके सुमन यांनी सांगितले की, लग्नानंतर हे जोडपे पोलीस ठाण्यात आले होते आणि तेव्हाच त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव तणाव कमी होईपर्यंत दूर राहण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, दरभंगा जिल्ह्यातीलच जयनगर येथे मिहिर कुमार झा या 40 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुसरी घटनाही समोर आली आहे, ज्याचा पोलीस तपास करत आहेत. शंकर ठाकूरच्या हत्येनंतर अस्थुआ गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी तिथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब..., सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात काय घडलं?