UP Crime News : कानपूरमध्ये 63 वर्षीय औषध व्यावसायिक विनीत विनोचा यांच्या हत्या प्रकरणाचा छडा 12 तासांच्या आत लावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विनीत यांच्या येथे काम करणाऱ्या विशाल गौतम याने साथीदार राज किशोर याच्यासोबत मिळून हत्या केली. रविवारी संध्याकाळी पोलिसांनी दोघांना घेरले. यावेळी झालेल्या चकमकीत दोघांच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह; आता पतीने केली पत्नीची हत्या, पोलिसांना स्वतः दिली माहिती
पोलिसांच्या चौकशीत विशालने हत्येमागे कथित कट असल्याचा दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, विनीत विनोचा यांच्या हत्येसाठी त्यांच्या सुनेकडून सांगण्यात आले होते आणि त्याबदल्यात पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या दाव्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींच्या जबाबांसोबतच CCTV फुटेज, कॉल डिटेल आणि इतर पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. हत्येची घटना कल्याणपूर येथील रतन आर्बिट अपार्टमेंटमधील C-104 फ्लॅटमध्ये घडली. विनीत विनोचा येथे कुटुंबासोबत राहत होते.
हेही वाचा : मनोजदादांनी फक्त आदेश द्यावा..मुंबईला जाऊ; महिलांचा सरकारला थेट इशारा
हल्लेखोरांनी झोपेत असताना विनीत यांच्यावर केला हल्ला
शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सुब्रत, सून शालू आणि सहा वर्षांचा नातू एका कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते. रात्री सुमारे तीन वाजता कुटुंबीय परतले, त्यावेळी फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडा होता. घरात प्रवेश केल्यानंतर खोलीत विनीत यांचा मृतदेह आढळला. खोलीत रक्त सांडलेले होते. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. तपासादरम्यान ज्या खोलीत विनीत झोपले होते, तेथे रक्ताचे डाग आणि संघर्ष झाल्याचे अनेक संकेत आढळले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी झोपेत असताना विनीत यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याने झटापट झाली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर हल्ला करण्यात आला. शरीरावरही चाकूने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत.
पोलिसांनी घेरल्यानंतर चकमक, दोघांच्या पायाला गोळी लागली
प्राथमिक तपासात घरात लूटमार झाल्याचे स्पष्ट पुरावे मिळालेले नाहीत. मौल्यवान वस्तू सुरक्षित आढळल्याने पोलिसांनी हत्येमागे वैयक्तिक वाद किंवा कटाची शक्यताही तपासात ठेवली आहे. दरम्यान, अपार्टमेंट आणि परिसरातील CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेजमधून पोलिसांना दोन संशयितांच्या हालचाली दिसल्या. त्यानंतर अपार्टमेंटच्या एन्ट्री रजिस्टरची तपासणी करून तेथे ये-जा करणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांची चौकशी करण्यात आली. तपास पुढे गेल्यानंतर विशाल गौतम आणि राज किशोर पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात आले. रविवारी संध्याकाळी पोलिसांनी दोघांना घेरून थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत दोघांच्या पायाला गोळी लागली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
ADVERTISEMENT












