Kolhapur Crime News : शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे अनैतिक संबंधातून लग्न करण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या कारणावरून एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरगाव येथील प्रकाश उर्फ बाबू पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिला सुरेखा शिवाजी न्यारे या शिरगावच्या माजी सरपंच होत्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपीला भिवंडी येथे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बीड : तू मला का बोलत नाहीस? विळ्याने हल्ला करत विचारणा, नंतर थेट तरुणाची बॉडी सापडली
लग्नासाठी दबाव टाकल्याने माजी महिला सरपंचाचा खून
मिळालेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे शेजारी राहणाऱ्या सुरेखा शिवाजी न्यारे आणि प्रकाश उर्फ बाबू पाटील यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. या संबंधातून सुरेखा न्यारे या प्रकाश पाटील याच्याकडे वारंवार लग्न करण्यासाठी आग्रह धरत होत्या. याच कारणावरून आरोपी प्रकाश पाटील चिडला होता. त्यानंतर रविवारी, 26 जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास लिडोरीच्या वाड्याजवळील म्हशीच्या गोठ्यात त्याने सुरेखा न्यारे यांचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा
गाडीच्या डिकीत सुरेखा न्यारे यांचा मृतदेह आढळला
हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह इको गाडीच्या डिकीत ठेवला आणि तो मलकापूरमार्गे भिवंडीच्या दिशेने निघाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, दरम्यान भिवंडी पोलिसांनी संशय आल्याने संबंधित इको गाडी अडवून तिची तपासणी केली. तपासणीदरम्यान गाडीच्या डिकीत सुरेखा न्यारे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी तातडीने प्रकाश उर्फ बाबू पाटील याला ताब्यात घेतले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी पोलिसांनी आरोपीला पुढील कारवाईसाठी शाहुवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासादरम्यान आरोपीने सुरेखा न्यारे यांच्याकडून लग्नासाठी वारंवार दबाव आणला जात असल्याच्या कारणातून हा खून केल्याचे समोर आले आहे. माजी सरपंच असलेल्या सुरेखा न्यारे यांच्या हत्येमुळे शिरगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास शाहुवाडी पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












