मुंबई : निवासी डॉक्टरांचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळला, नेमंक काय घडलं?

मुंबई तक

• 03:48 PM • 12 Oct 2026

Mumbai Doctor Suicide Case : भूलीच्या इंजेक्शनचा ओव्हर डोस घेतल्याने मुंबईतील सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर डॉ. शिवशरणप्पा पाटील यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या कामाचे तास, विश्रांती आणि मानसिक आरोग्यासाठी उपाययोजना करण्याची मार्डची मागणी.

Mumbai Doctor Suicide Case

Mumbai Doctor Suicide Case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबई : निवासी डॉक्टरांचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळला

point

मानसिक आरोग्यासाठी उपाययोजना करण्याची मार्डची मागणी

Mumbai Doctor Suicide Case, मुंबई : मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयातील निवासी डॉक्टर डॉ. शिवशरणप्पा पाटील यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा ओव्हर डोस घेऊन त्यांनी हे पाऊल उचल्याचं पोलिसांनी सांगितलं. ते रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिकत होते. शनिवारी (10 ऑक्टोबर) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृतदेह वसतिगृहातील स्वच्छतागृहात आढळला. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या कामाचे तास, पुरेशी विश्रांती आणि मानसिक आरोग्याच्या मदतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : "मला ज्ञानेश कुमारांचे मेसेज येतात..", राहुल गांधी पत्रकार परिषदेत आक्रमक; निर्वाणीचा इशारा

मृतदेह वसतिगृहातील स्वच्छतागृहात आढळला

डॉ. शिवशरणप्पा पाटील हे मूळचे कर्नाटकचे होते. ते मुंबईतील सायन येथील महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह वसतिगृहातील स्वच्छतागृहात आढळला. बराच वेळ खोली बंद असल्याने या घटनेची माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. डॉ. पाटील यांच्या मृत्यूमुळे निवासी डॉक्टरांच्या कामाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : भाजपच्या माजी आमदाराची 70 ते 80 जणांकडून हत्या, संतापलेला जमाव अन्... नेमकं घडलं तरी काय?

2010 ते 2019 या कालावधीत भारतात 105 निवासी डॉक्टरांच्या आत्महत्या 

या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मार्डच्या शाखेने शोक व्यक्त केला. निवासी डॉक्टरांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने केली आहे. दीर्घकाळ काम करावे लागणे, कामाचा अतिरिक्त ताण आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यांमुळे डॉक्टरांवर दबाव येत असल्याचे मार्डने म्हटले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरील कृती दलाच्या अहवालाचाही संघटनेने उल्लेख केला. या अहवालानुसार, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या 31.2 टक्के निवासी डॉक्टरांनी आत्महत्येचे विचार आल्याचा अनुभव नोंदवला होता. तसेच, 2010 ते 2019 या कालावधीत भारतात निवासी डॉक्टरांच्या आत्महत्येच्या 105 घटनांची नोंद झाल्याचे एका संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

निवासी डॉक्टरांमध्ये झोपेची कमतरता आणि कामाच्या अतिताणामुळे होणारा थकवा याबाबतची चिंता अनेक वर्षांपासून कायम असल्याचे मार्डने म्हटले आहे. काही निवासी डॉक्टरांना सलग 36 तासांपेक्षा अधिक काळ काम करावे लागत असल्याचेही संघटनेने सांगितले. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगासह संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या कामाच्या तासांवर नियंत्रण ठेवणे, पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देणे, विश्रांतीचा कालावधी निश्चित करणे आणि मानसिक आरोग्यासाठी सहज उपलब्ध होणारी मदत देणे, या उपाययोजना राबवण्याचे आवाहन मार्डने केले आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी निवासी डॉक्टर सातत्याने काम करतात; मात्र त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे आणि कल्याणाकडेही दुर्लक्ष होता कामा नये, असे संघटनेने म्हटले आहे. डॉ. पाटील यांच्या मृत्यूमुळे डॉक्टरांच्या कामाच्या परिस्थितीत ठोस सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.