Crime News : एक अत्यंत सुन्न करणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक नृत्य उत्सवात पतीच्या हातून झालेल्या जाहीर अपमानामुळे दुखावलेल्या एका 28 वर्षीय महिलेने आपल्या दोन निष्पाप बालकांसह स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. मरियाम्मल असे या दुर्दैवी आईचे नाव असून, तिच्या या टोकाचा निर्णयामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेत तिची दोन्ही लहान मुले कबीनेश्वरन (वय 6 वर्षे) आणि रबीनेश्वरन (वय 4 वर्षे) यांचाही होरपळून वेदनादायक मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील तेनकासी जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
सर्वांसमोर अपमान
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मरियाम्मल आपल्या दोन्ही मुलांना घेऊन गावातील मंदिरात चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी गेली होती. या उत्सवादरम्यान तिचा पती कालीपांडी हा दारूच्या नशेत धुंद होऊन तेथे पोहोचला. दारूच्या नशेत असलेल्या कालीपांडीने सर्वांसमोर मरियाम्मलशी हुज्जत घातली आणि लोकांच्या समक्ष तिला मुस्काटात मारून तिचा अपमान केला. शेकडो उपस्थितांसमोर झालेल्या या जाहीर अपमानामुळे मरियाम्मल कमालीची हताश झाली आणि अपमानाच्या भावनेतून ती दोन्ही मुलांना घेऊन तडक घरी परतली.
हे ही वाचा : हिंगोली हादरलं! ड्युटीवर असणाऱ्या इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याची निर्घृपणे हत्या
अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल
घरी पोहोचल्यानंतर प्रचंड नैराश्य आणि रागाच्या भरात मरियाम्मलने घराचे दरवाजे आतून बंद करून घेतले. तिने आधी आपल्या दोन्ही निष्पाप मुलांना अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले आणि त्यानंतर स्वतःवरही रॉकेल ओतून पेटवून घेतले. आगीच्या ज्वाला आणि मुलांच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र दरवाजा आतून बंद असल्याने कोणालाही वेळेत मदत करता आली नाही. आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, मरियाम्मल आणि तिच्या दोन्ही चिमुकल्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
हे ही वाचा : प्राध्यापकाच्या हत्येने लातूर हादरलं, बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, 2 भावांनी मिळून संपवलं
पतीचे दारुचे व्यसन अन्...
या हृदयद्रावक घटनेनंतर तामिळनाडू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालीपांडी हा दारूचे व्यसन असलेला व्यक्ती असून तो कौटुंबिक कलहाला कारणीभूत ठरत होता. सध्या पोलिसांनी कालीपांडीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पतीच्या दारूच्या व्यसनामुळे आणि जाहीर अपमानामुळे एका संपूर्ण कुटुंबाचा कसा दुर्दैवी अंत झाला, यावरुन संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT












