Pradeep Purnekar murder case : ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करुन हत्या करण्यात आलीये. गणेश नगर येथील त्यांच्या कार्यालयात हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी पुर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळीबार केल्यानंतर धारदार शस्त्रांनीही हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ठाण्यात खळबळ उडाली असून हल्ल्यामागील कारण आणि हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ‘पैशांचा पाऊस पडेल', असं सांगितलं अन्... भुरट्या टोळीकडून 92 लाखांच्या नोटा जप्त
हत्या प्रकरणात पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय
या प्रकरणात पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती अशा पाच संशयितांची नावे समोर आली आहेत. उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्राँचसह पोलिसांची नऊ पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जात आहे. दरम्यान, पूर्णेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला असून त्यात चेहऱ्याला रुमाल बांधलेले दोन जण दुचाकीवरून पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत.
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर यांनी या घटनेनंतर गंभीर आरोप केले आहेत. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी वडिलांना मारण्याची धमकी दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे. राजेंद्र शिंदे यांनी बैठक घेऊन हे सर्व केल्याचा आरोपही राम पूर्णेकर यांनी केला. वडिलांना न्याय मिळेपर्यंत आपण येथून हलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर प्रदीप पुर्णेकर यांचे मोठे भाऊ जयनाथ पुर्णेकर यांनीही हल्ल्याबाबत दावा केला आहे. गणपतीपासून काही जण रेकी करत होते, असा आरोप त्यांनी केला. तसेच पोलिसांनी क्लस्टरच्या अनुषंगाने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. तिघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचेही जयनाथ पूर्णेकर यांनी सांगितले.
दरम्यान, प्रदीप पुर्णेकर यांच्यावर नेमका हल्ला कशामुळे करण्यात आला आणि या हल्ल्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मानपाड्यातील गणेश नगर येथील कार्यालयात तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी पूर्णेकर यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबारात जखमी झाल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेज, ताब्यात घेण्यात आलेले संशयित आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












