Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतर 24 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीये. हुंड्याच्या मागणीवरून पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला गेल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नासाठी कुटुंबीयांनी सुमारे 45 लाख रुपये खर्च केले होते, तसेच 116.64 ग्रॅम म्हणजेच 10 तोळे सोने दिले होते. मात्र, त्यानंतरही चारचाकी खरेदी करण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्याची मागणी केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
लग्नानंतर परिस्थिती बदलल्याचा आरोप
मृत महिलेचे नाव वैष्णवी ओंकार गिसरे असे आहे. त्या पुण्यातील वडाचीवाडी परिसरातील एका निवासी सोसायटीमध्ये पतीसोबत राहत होत्या. वैष्णवी यांचा विवाह ओंकार संजय गिसरे (वय 28) यांच्यासोबत 9 मे रोजी झाला होता. विवाहासाठी वैष्णवी यांच्या कुटुंबीयांनी सुमारे 45 लाख रुपये खर्च केले होते. तसेच लग्नात 10 तोळे सोने भेट म्हणून दिले होते. मात्र, लग्नानंतर परिस्थिती बदलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
5 लाखांच्या मागणीसाठी मानसिक आणि शारीरिक छळ
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, चारचाकी वाहन घेण्यासाठी वैष्णवी यांनी माहेरून 5 लाख रुपये आणावेत, अशी वारंवार मागणी केली जात होती. या मागणीवरून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. गुरुवारी रात्री वैष्णवी यांनी पुण्यातील राहत्या घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर वैष्णवीचे वडील प्रविण रघुनाथ जरांडे (वय 51, रा. पुरंदर तालुका) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी वैष्णवी यांचे पती ओंकार संजय गिसरे, सासरे संजय महादेव गिसरे (49) आणि सासू रुपाली संजय गिसरे (42) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












