Abhijeet Dipke and CJP Press Conference : छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या कोअर कमिटीची दोन दिवसांची बैठक अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला सौरव दास, आशुतोष रांका आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पक्षाची पुढील वाटचालीसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके यांनी पक्षाच्या आगामी भूमिका आणि कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी सप्टेंबर महिन्यात 'क्या बोलती पब्लिक' या नावाने देशव्यापी अभियान सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नागपूर: 16 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीकडून तुरूंगातून पिज्जा बर्गरची मागणी, म्हणाला..
गांधी, आंबेडकर अन् नेहरुंच्या विचारांवर काम करणार
पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दीपके यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत तो आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे म्हटले. मात्र, त्याहून मोठी उपलब्धी म्हणजे नागरिकांच्या मनातील भीती संपल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या काही वर्षांत सरकारने निर्माण केलेली भीती आता लोकांच्या मनातून दूर झाली असून नागरिक आता प्रश्न विचारण्यासाठी आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉक्रोच जनता पार्टीची विचारधारा ही भारतीय राज्यघटनेच्या विचारांवर आधारित असल्याचे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाहिलेल्या भारताच्या स्वप्नाला अनुसरून पक्ष काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर विश्वास ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : हिंगोलीत आयुष्य संपवलेल्या मुलाच्या आईची Abhijit Dipke यांच्याकडून काय अपेक्षा?
नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी अभियान राबवणार
दीपके यांनी 'क्या बोलती पब्लिक' या अभियानाचा उद्देश स्पष्ट करत देशभर दौरा करून नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेणार असल्याचे सांगितले. सध्याचे राजकीय पक्ष आणि सरकार लोकांपासून दूर गेले असून विशेषतः 35 वर्षांखालील तरुणांच्या शिक्षण, बेरोजगारी आणि भविष्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षण परवडणारे राहिले नसल्याचे सांगत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंगच्या वाढत्या शुल्कामुळे शिक्षण हे कर्जाचे ओझे बनत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण हा मूलभूत अधिकार असून त्याचे व्यवसायीकरण थांबवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यावर पक्षाचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नीट आंदोलनाच्या संदर्भाने संस्थांवरील विश्वास कमी झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी अभिजीत दीपके यांनी न्यायव्यवस्था, माध्यमे आणि बेरोजगारीबाबतही भूमिका मांडली. न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कमी होत असल्याचा दावा करत सामान्य नागरिकांच्या प्रकरणांमध्ये विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच माध्यमांनी सत्तेला प्रश्न विचारणे थांबवल्याने त्यांची विश्वासार्हता कमी झाल्याचेही ते म्हणाले. बेरोजगारी हा देशातील सर्वात मोठा प्रश्न असून शिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात बेरोजगारी, शिक्षण, संस्थांची जबाबदारी आणि नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून पक्ष काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र आणून व्यापक सहकार्याची उभारणी करण्याचाही पक्षाचा मानस असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ADVERTISEMENT












