भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात BJP चा पराभव का झाला?

मुंबई तक

05 Aug 2026 (अपडेटेड: 05 Aug 2026, 09:38 AM)

bihar bankipur datia bypoll results : बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालांमागील कारणांवर आणि मतदानाच्या ट्रेंडवर रुद्रा रिसर्चने सविस्तर विश्लेषण मांडले.

bihar bankipur datia bypoll results

bihar bankipur datia bypoll results

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात BJP चा पराभव का झाला?

point

निकालांमागील कारणांवर आणि मतदानाच्या ट्रेंडवर रुद्रा रिसर्चने सविस्तर विश्लेषण

पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या दोन्ही मतदारसंघांकडे देशाचे लक्ष वेधले गेले. बिहारमधील बांकीपूर ही जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राज्यसभेवर निवड झाल्यानंतर रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेवरील पोटनिवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. दुसरीकडे मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली. रुद्रा रिसर्चने मतदानापूर्वी दिलेला एक्झिट पोल जवळपास अचूक ठरल्याचा दावा संस्थेचे प्रतिनिधी विशाल लिंगायत यांनी केला. त्यांच्या मते, गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण, मतदारांशी संवाद आणि स्थानिक राजकीय घडामोडींचा अभ्यास करून हे अंदाज व्यक्त करण्यात आले होते.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पाऊस घालणार धुमशान, काही जिल्ह्यांना मोठा अलर्ट

स्थानिक प्रश्नांवर केंद्रित प्रचार हा महत्त्वाचे घटक

रुद्रा रिसर्चच्या विश्लेषणानुसार, बिहारमधील बांकीपूर मतदारसंघात जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी सुमारे 19 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. या विजयामागे भाजपने उमेदवार बदलल्याने निर्माण झालेला राजकीय संदेश, प्रशांत किशोर यांची गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली सातत्यपूर्ण जनसंपर्क मोहीम आणि बेरोजगारी, पलायन, ड्रेनेजसारख्या स्थानिक प्रश्नांवर केंद्रित प्रचार हे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, हा मतदारसंघ पारंपरिक जातीय समीकरणांसाठी ओळखला जात असला तरी यावेळी मुद्द्यांवर आधारित राजकारणाला मतदारांनी प्रतिसाद दिल्याचा दावा करण्यात आला. विशेषतः 18 ते 35 वयोगटातील मतदार मोठ्या प्रमाणावर प्रशांत किशोर यांच्या बाजूने वळल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्याचबरोबर विविध सामाजिक गटांमधूनही त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळाल्याचे विश्लेषणात नमूद करण्यात आले.

हेही वाचा : पुण्याची गोष्ट: MSRTC च्या वतीने तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशसाठी विशेष टूर पॅकेजेस

ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी न मिळाल्याने अंतर्गत नाराजी 

दतिया पोटनिवडणुकीबाबत बोलताना विशाल लिंगायत यांनी काँग्रेसच्या विजयामागे अनेक स्थानिक कारणे असल्याचे सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर झाल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांची स्थानिक प्रतिमा, शहर भागातील मिळालेली आघाडी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेला प्रचार यांचाही निकालावर प्रभाव पडल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी आझाद समाज पक्षाच्या उमेदवाराला लक्षणीय मतांचा वाटा मिळाल्याने काँग्रेसच्या पारंपरिक मतांमध्ये काही प्रमाणात विभागणी झाली, तरीही काँग्रेसने विजय मिळवला. या मतदारसंघातही 18 ते 35 वयोगटातील मतदारांमध्ये झालेला कल काँग्रेसच्या बाजूने असल्याचे रुद्रा रिसर्चने नमूद केले.

या दोन्ही निकालांतून सर्वच पक्षांसाठी काही महत्त्वाचे संदेश असल्याचे रुद्रा रिसर्चने स्पष्ट केले. बिहारमध्ये राजदला आपला पारंपरिक मतदार कायमस्वरूपी गृहित धरता येणार नाही, तर भाजपसाठी मजबूत उमेदवार, सातत्यपूर्ण प्रचार आणि युवा मतदारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. सोशल मीडियाचा आणि युवकांशी संबंधित आंदोलनांचा परिणाम मतदानावर होऊ शकतो, असेही विश्लेषणात नमूद करण्यात आले. मध्य प्रदेशात भाजपने स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित करू नयेत, तर काँग्रेसनेही हा विजय कायमस्वरूपी यश मानू नये, कारण स्थानिक परिस्थिती आणि विविध राजकीय घटकांनुसार भविष्यातील समीकरणे बदलू शकतात, असे रुद्रा रिसर्चने आपल्या विश्लेषणात म्हटले आहे.