झिरवाळांच्या Video प्रकरणावर CM फडणवीसांचं मोठं विधान.. म्हणाले, 'तर कारवाई होईलच!'

Narhari Zirwal Video: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशावेळी या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

action certainly taken after verifying authenticity of video cm fadnavis major statement regarding narhari zirwal video controversy

Narhari Zirwal Video

मुंबई तक

• 07:53 PM • 27 Mar 2026

follow google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (27 मार्च)  मोठं विधान केलं आहे. झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री असं म्हणाले की, 'असं आहे की, नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवरून संपर्क साधत मला असं सांगितलं की, हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक तक्रार दाखल करावी.' पण याचविषयी पुढे मुख्यमंत्री असंही म्हणाले की, 'जे काही व्हिडिओ समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जर सत्य असतील तर त्यावर योग्य ती कारवाई होईलच.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं आहे.

हे वाचलं का?

झिरवाळांच्या Video बाबत नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?

'असं आहे की, नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवरून संपर्क साधत मला असं सांगितलं की, हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक तक्रार दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल. जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू.'

हे ही वाचा>> 'तो' तृतीयपंथी अनेकांना भेटायचा.. झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

'असं आहे की, मागच्या काळात जी घटना (लाच प्रकरण) घडली त्याची पूर्ण चौकशी झाली. त्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे.. जे काही व्हिडिओ समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जर सत्य असतील तर त्यावर योग्य ती कारवाई होईलच.'

त्यामुळे या प्रकरणात निर्णय घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील पावले उचलली जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अशोक खरात प्रकरणात ‘कोणालाही सोडणार नाही’, फडणवीसांचा कठोर इशारा

दरम्यान, अशोक खरात यांच्या प्रकरणावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत प्रतिक्रिया दिली. फक्त फोटो किंवा व्हिडिओ आल्यावर लगेच निष्कर्ष काढता येणार नाहीत, असं सांगत ते म्हणाले, “फोटो आणि व्हिडिओ आलेल्यांचा सहभाग आहे का, हे महत्त्वाचं आहे. सहभाग असेल तर कारवाई होईल. फक्त फोटो निघाला म्हणून दोषी ठरवता येणार नाही.”

हे ही वाचा>> नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ, तृतीयपंथी व्यक्तीसोबतच्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे खळबळ

फडणवीस पुढे म्हणाले, “या प्रकरणात कोणालाच सोडण्याचं कारण नाही. आम्ही अतिशय खोलात जात आहोत. अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत. काही पीडित अजून समोर येत आहेत. काही महिला पुढे येत आहेत. याशिवाय आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारीही येत आहेत. त्यांचे एफआयआर लवकरच दाखल होणार आहेत.” असं मुख्यमंत्री म्हणाले.

पीडित महिलांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांवर कारवाई

अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांच्या गोपनीय व्हिडिओ सोशल मीडिया साइट्सवर अपलोड करण्याच्या घटनेवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली. “या दुर्दैवी महिलांच्या व्हिडिओ काही लोकांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते. मी ते सर्व व्हिडिओ हटवले आहेत. ज्या-ज्या लोकांनी असे व्हिडिओ अपलोड केले असतील, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल,” असं फडणवीस यांनी बजावलं.

पीडित महिलांना पूर्ण संरक्षण देण्यात आल्याचं सांगताना ते म्हणाले, “ज्या महिला पुढे आल्या आहेत, त्यांना संपूर्ण संरक्षण दिलं आहे. यापुढेही ज्या महिला येतील, त्यांनाही संरक्षण दिलं जाईल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गोपनीयतेचं संरक्षण. काही लोक ही गोपनीयता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावं लागेल.”

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विधानांमुळे दोन्ही प्रकरणांमध्ये प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे.