पुणे: राज्यात 29 महापालिकेसाठी निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. अशावेळी मुंबईसह पुण्यात नेमकं काय होतं याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. एकीकडे भाजपने काही महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी युती केलेली आहे. तर दुसरीकडे भाजपने मात्र या निवडणुकीत अजित पवारांना लांबच ठेवलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवार नेमकी काय कमाल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच सगळ्याबाबत अजित पवारांनी मुंबई Tak ला एक महामुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांची मतं मांडली.
ADVERTISEMENT
अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी नेमकी युती का केली? भाजप नेत्यांकडून अजितदादांवर होणाऱ्या टिकेबाबत त्यांना नेमकं काय वाटतं, राज्यातील राजकारणाबाबत अजितदादांची नेमकी भूमिका काय.. या सगळ्या मुद्यावर अजित पवार यांनी मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत उत्तरं दिली. पाहा या मुलाखतीत नेमकं काय-काय म्हणाले अजित पवार.
अजित पवारांची राष्ट्रवादी (शरद पवार) नेमकी का झाली युती?
'इथे मी एकनाथरावांना पण विचारलं की, भाजप इथे स्वतंत्र लढायचं म्हणत आहे. तर तुम्ही-आम्ही एकत्र यायचं का? ते म्हणाले नाही, माझी भाजपबरोबर चर्चा चालू आहे. एबी फॉर्म द्यायच्या आदल्या दिवशी मला त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की, आमचं त्यांचं जमत नाही.. आपण एकत्र यायचं का? मी म्हटलं, मी तुम्हाला विचारत होतो एकत्र यायचं का.. आता मी उमेदवार फिक्स केले आहेत. लोकांना कामाला लागा असं सांगितलंय. आता जर एकत्र आलो तर मी किती लोकांना नाराज करेन. त्यांचे फॉर्म भरले गेले, बंडखोरी झाली तर मतांची विभागणी होईल.'
'फॉर्म मागे घेतल्यानंतरही काही लोकं उदय सामंतने माझ्याकडे पाठवली. की, बघा अजून काही मार्ग निघतोय का. शेवटी श्रीरंग बारणे यांनी दोन प्रभागामध्ये अशी युती केली. पुण्यात पण आम्ही तसा प्रयत्न केला. पण पुण्यात काही जमलं नाही. तिथे अडचण झाली.'
हे ही वाचा>> महामुलाखत: 'बाळासाहेब गेल्यानंतर भाजपने शिवसेनेचा...', उद्धव ठाकरेंचा घणाघात, अत्यंत गंभीर आरोप
'राष्ट्रवादी काँग्रेसशी जमलं, तुतारीशी... मी विचार केला की, मागे पक्ष एकत्र असताना लढलो. त्यावेळेसची ती निवडणूक आणि आताचं निवडणूक.. यामध्ये मतांची विभागणी न होऊन देण्याकरिता एकत्र आलो तर आपली जी काही संख्या आहे ती वाढेल. शेवटी मॅजिक फिगरलाच महत्त्व असतं. बाकीच्या चर्चेला काही महत्त्व नसतं.'
'अमोल कोल्हे, मी आणि रोहित एकत्र बसलो आणि म्हणालो की, माझं असं काही नाही की आमच्याच चिन्हावर लढा. मी उलट असं म्हणालो की, असं करा जिथे तीन तुतारी असेल आणि एक घड्याळ असेल तिथे चारही तुतारी घ्या. सेम दुसरीकडे असंच करा.. तसं ठरल्यावर जुळलं.'
हे ही वाचा>> महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ आजही मोठा ब्रँड? मुंबईतील लोकांना काय वाटतं? C Voter च्या सर्व्हेमध्ये नेमकं काय?
'आता सध्या तरी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत इथले दोन्ही NCP चे लोकं भेटले आणि सांगितलं की, तुम्ही एकत्र आलात तर चांगलं होईल निवडणुकीत. शेवटी आम्ही अनेक वर्ष एकत्रच काम केलंय. कार्यकर्ते म्हणाले त्यामुळे शक्य झालं.' असं अजित पवार म्हणाले.
भाजपच्या टिकेला अजित पवारांनी काय दिलं उत्तर?
तुम्ही म्हणाले की, 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप ज्यांनी केला त्यांच्यासोबतच मी आज सत्तेत आहे. रवींद्र चव्हाण त्यानंतर म्हणाले की, मी सांगत होतो की, आमची चूक झाली. नाही घ्यायला पाहिजे होतं अजितदादांना. याबाबत बोलताना पाहा अजित पवार काय म्हणाले.
'आम्ही चर्चा केली ही वरिष्ठ पातळीवर केली. अशाप्रकारची चर्चा ही खालच्या पातळीवर होत नाही. त्यामुळे वर जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि खाली फडणवीसांशी चर्चा झाली. त्यामुळे बाकीच्यांशी चर्चा करण्याचं काही नव्हतं.'
'मी आता या निवडणुका पहिल्यांदा झाल्यानंतर.. आता त्यांनी काय स्टेटमेंट करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना कोणी सांगितलं असेल आणि त्यांनी भाष्य केलं असं वाटत नाही. ते लातूरमध्ये काय बोलले हे आपण पाहिलं. विलासरावांचं नाव पुसून टाका.. वैगेरे..'
'माझ्याबाबत बोलले त्याबाबत देवेंद्रजी काही बोलले.. पण याचा अर्थ तुम्हाला एक मान्य करावं लागेल रवींद्र चव्हाणांना अनेक वर्ष ओळखतो. ते ठाणे कल्याण-डोंबिवली इथे काम करत होते.मला पण त्यांचा राजकीय इतिहास पूर्ण माहिती आहे. त्यांनी माझ्याबाबत वक्तव्य करताना फार काही कोणाशी चर्चा केली असेल असं वाटत नाही.' असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
'यशवंतराव चव्हाणाचं राजकारण एकट्यानेच केलं तर संपून जाऊ', राजकारणावर अजित दादांचं मत
'सर्वच राजकीय पक्षांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा काळामध्ये जसा सुस्कंकृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, कसं राज्यकर्त्यांनी वागलं पाहिजे याचा परिपाठ चव्हाण साहेबांनी घालून दिला होता. त्यावेळेसचे राज्यकर्ते हे सगळ्यांना पटलं होतं.'
'परंतु नंतरच्या काळात सतत संदर्भ बदलतच चालले आहेत. आता तुम्ही एकट्यानेच चव्हाण साहेबांचा संदर्भ डोळ्यासमोर ठेवून राजकारण करायचं म्हटलं आणि बाकीचं कुणीच करणार नाही तर तुम्ही संपूनच जाल.'
'मोहोळ म्हणाले अजितदादांचा पक्षाने गुंडांच्या घरातील लोकांना तिकिटं दिली आहेत. एकाच युतीत असून अशी टीका सुरू आहे तुमच्यावर.'
'आता जे फॅक्ट आहे ते आहे.. आता बोलताना मी किंवा देवेंद्रजी असं आम्ही बोलू त्यावेळेस त्याला वेगळं महत्त्व येईल. पण आम्ही दोघं त्यात समंजस्यपणा दाखवतोय. जे कोणी बोलतायेत.. माझ्याबद्दल असतील किंवा काय ते बोलताना.. तुम्हाला एक सांगतो बाडगे लोकं असतात ना.. बाडगा.. तो वरिष्ठांना दाखवण्याकरिता मी किती तुमच्यात समरस झालोय हे दाखवण्याकरिता असं बोलत असतात. काय-काय जणांनी असं सांगितलंय.. माझ्याकडे तर भाषणं आहेत की, कुठल्याही परिस्थितीत भाजपचं जे चिन्ह आहे त्याला तुम्ही मतदान करू नका. तुम्हाला.. त्यांचा समाजातील जो कोणी महत्त्वाचा देव आहे त्याची शपथ घातली. इथपर्यंत राजकारण गेलंय.' असं म्हणत अजित पवारांनी याबाबत नेमकं भाष्य केलं.
कुठे आणि कधी पाहता येईल अजित पवारांची महामुलाखत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महामुलाखत ही आपल्याला मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल. ही संपूर्ण मुलाखत आपल्याला उद्या (12 जानेवारी 2026) दुपारी 12.00 वाजता पाहता येईल.
ADVERTISEMENT











