सिन्नर: सामाजिक कार्यकर्त्या व भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज (24 मार्च) मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर व खरातच्या फार्महाऊसला भेट देऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॅप्टन अशोक खरात यांच्यावर जमीन लुटण्यापासून ते महिलांच्या लैंगिक शोषणापर्यंत गंभीर आरोप केले. ईशान्येश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन तो तिथेही महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा त्यामुळे खरात ‘माणसाच्या रूपातील राक्षस आहे.’ असं म्हणत तृप्ती देसाईंनी खरातला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. त्याचबरोबर त्याच्या साथीदारांनाही शिक्षा मिळावी, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
ADVERTISEMENT
'मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन महिलांवर...', तृप्ती देसाईंचे खळबळजनक आरोप
तृप्ती देसाई म्हणाल्या, “मिरगावचं नाव हे या अशोक खरातमुळे बदनाम होतंय. गावकरी चिंतेत आहेत की, आपल्या गावाचं नाव खराब नाही झालं पाहिजे. मिरगावमध्ये ज्या पद्धतीने अशोक खरातने अनेक जमिनी लुटल्या असतील, जमीन खरेदीत सहकार्य केलं नसेल तर त्यांना गायब करणं किंवा मारून टाकणं, इथपर्यंत गोष्टी समोर आलेल्या आहेत.”
हे ही वाचा>> 'अशोक खरातला भेटलेल्या लोकांची HIV टेस्ट करा, नाहीतर सगळे मरतील', बड्या नेत्याची थेट विधानसभेत मागणी
महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा सर्वांत गंभीर असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “100 च्या वर पुरावे समोर आलेले आहेत. 5 मार्च 2026 रोजी जेव्हा ही माहिती व काही व्हिडिओ आमच्याकडे आले, तेव्हा सांगितलं गेलं की, नाशिकच्या त्याच्या ऑफिसमध्ये जसं लैंगिक शोषण केलं जायचं, तसंच ईशान्येश्वर मंदिरातील पायऱ्या उतरून गाभाऱ्यातही केलं जायचं. गाभारा हा फार पवित्र असतो. मी देवाला मानणाऱ्यातील आहे. मी आल्यावर पहिले देवाला नमस्कार केला. ज्या देवाच्या नावावर ही काळीकृत्यं करत होता, त्या देवालाही तो घाबरत नव्हता. गाभाऱ्यातील पिंडीच्या कोपऱ्यातही महिलांना घेऊन अत्याचार करायचा. पिंडीच्या शेजारी बोलावून चुकीचे प्रकार करायचा. हे अत्यंत गंभीर आहे.”
खरातला ‘राक्षस’ म्हणत तृप्ती देसाईंनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे. “माणसाच्या रूपात एखादा राक्षस असणं म्हणजे तो अशोक खरात आहे. त्यामुळे अशोक खरातला यामध्ये फासावर लटकवलं पाहिजे. याच्यातून त्याची सुटका नाही झाली पाहिजे. त्याच्याबरोबर ट्रस्टवर असलेले, काळ्या धंद्यात साथीदार, पार्टनरशिपमध्ये असलेले, कमिशन घेणारे एजंट या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे.”
व्हिडिओ पुरावे मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांना दिले; परदेशात पळून जाण्याचा डाव उधळला
तृप्ती देसाई यांनी या सगळ्याचा प्रकरणाचा घटनाक्रमही सविस्तर सांगितला. “5 मार्चला माझ्याकडे पेनड्राइव्ह आला. मी ते व्हिडिओ काही पाहिले. जे लोक माझ्याकडे हे व्हिडिओ घेऊन आले होते त्यांनी सांगितलं की, 6 मार्चला पत्रकार परिषद घ्यायची. पण खरातचं 12 मार्चचं ऑस्ट्रेलियाचं तिकिट कन्फर्म झालं होतं. तो पळून जाण्याच्या तयारीत होता. फिर्यादी महिला तेव्हा आमच्याकडे आली नव्हती. आम्ही पत्रकार परिषद घेतली असती तर खरात रात्रीतून परदेशात गेला असता. म्हणून 6 मार्चला तातडीने नगरचे एसपी सोमनाथ घार्गे यांच्याकडे व्हिडिओ पाठवले.”
हे ही वाचा>> अशोक खरातच्या मुलीची उपजिल्हाधिकाऱ्याच्या बायकोसोबत जमिनीची भागीदारी, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा
“एसपी घार्गे यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर गंभीरतेने लक्ष घातले.10 दिवसांपूर्वी शिर्डीला एक गुन्हा दाखल झाला होता, त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी लक्षात आल्या. 6 तारखेला प्रकरण त्यांच्याकडे गेलं तेव्हा अॅडिशनल एसपींच्या माध्यमातून डीजींकडून पेनड्राइव्ह सीएमपर्यंत पोहोचला. 10 मार्चला लूकआऊट नोटीस जाहीर झाली. त्यामुळे खरात बाहेर जाऊ शकला नाही.”
“फिर्यादी महिला समोर येण्यास वेळ लागल्याने गुन्हा नोंदणीला उशीर झाला. सीएमने नाशिक पोलिसांना आदेश दिल्यानंतर फिर्यादी शोधण्यात पुढाकार घेतला गेला. 5 मार्चला व्हिडिओ आले, 6 मार्चला पोलिसांपर्यंत, 7 तारखेपर्यंत डीजी व सीएमपर्यंत पोहोचले. 13 मार्च रोजी SIT स्थापन झाली. 16 तारखेला फिर्यादीचा जबाब झाली आणि 17 तारखेला खरातला अटक झाली. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आम्ही ४-५ जण होतो, त्यामध्ये मी होते.” तृप्ती देसाई यावेळी म्हणाल्या.
रुपाली चाकणकरांवर टीका; ‘पप्पा’ म्हणून का पाठिंबा?
तृप्ती देसाई यांनी खरातला ‘गुरू’ मानणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्यावर तीव्र टीका केली. “एखादा गुरू करणं, त्याला नतमस्तक होणं यात वाईट काहीच नाही. परंतु तो जर काही चुकीचं करत असेल आणि हे जर तुम्हाला माहीत असेल तर त्याला पाठिशी घालण्याचं काम रुपाली चाकणकरांनी का केलं? जेव्हा-जेव्हा हे खरातचे विषय समोर आले तेव्हा दबाव आणण्याचा प्रयत्न का केला? एकदाही तुम्ही का विचारलं नाही की, शोषण झालंय का? अशा बातम्या समोर येत आहेत तर खरातने खरंच हे केलंय का? चौकशी का केली नाही? ट्रस्टवर राहायचं की नाही याचा विचारही केला नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “त्या एवढ्या आहारी गेल्या होत्या की, माझ्या माहितीप्रमाणे त्या खरातला ‘पप्पा’ म्हणायच्या. मग जे पप्पा आहेत तुमचे, त्या पप्पाने काही केलं तरी चालतं का? त्या पप्पांना वाचविण्याचा प्रयत्न तुम्ही करता. आता पप्पांना भेटायला तुम्ही जेलमध्ये येणार आहात का? सोयीचं राजकारण करू नका. महिलांना न्याय देणं महत्त्वाचं आहे.”
'एकच लक्ष्य, खरातला शिक्षा आणि पीडितांना न्याय'
तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले की, आरोप-प्रत्यारोपापेक्षा त्यांचं एकच टार्गेट होतं. गुन्हा दाखल होणे आणि खरातला बेड्या पडणे. “आता एकच टार्गेट आहे की, खरातला शिक्षा होणं आणि पीडितांना न्याय मिळणं.”
या प्रकरणात 100 हून अधिक पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि अनेक महिलांच्या तक्रारी समोर आल्या असून, SIT तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणाने मिरगावच्या गावकऱ्यांमध्येही संतापाची लाट आहे. खरातच्या कृत्यांमुळे गावाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे स्थानिक सांगत आहेत. प्रकरण आता फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणीही तृप्ती देसाई यांनी केली आहे.
ADVERTISEMENT











