BJP Candidate Shraddha Bhosale trolled over marathi Speaking : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरणात चांगलंचं तापलेलं पाहायला मिळालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात निवडणुकीला सामोरे जात आहेत. दरम्यान, सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे दीपक केसरकर स्वतः उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. तर सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्यातील श्रद्धा सावंत भोसले यांनी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र, श्रद्धा भोसले यांनी सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असला तरी त्यांना मराठी व्यवस्थित बोलता येत नसल्याने ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगनंतर मंत्री नितेश राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भाजपचीही घराणेशाही जोमात, एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी, कोणत्या जिल्ह्यात लढणार निवडणूक?
श्रद्धा राजे भोसले मराठी शिकण्याचा प्रयत्न तरी करतायत - नितेश राणे
नितेश राणे म्हणाले, श्रद्धा राजे भोसले मराठी शिकण्याचा प्रयत्न तरी करतायत. लग्न करुन त्या सावंतवाडीमध्ये आल्या आहेत. त्या सावंतवाडीकरांच्या नाहीत असं आता कोणालाही वाटणार नाही. त्यांनी आपली संस्कृती स्वीकारलेली आहे. भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत. याचे तर कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या बदनामीचे विषय चालू आहेत. माझं म्हणणं निवडणुका येतील, जातील पण आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींच्या अशा पद्धतीचा अपमान निवडणुकीसाठी कोणी करू नये. मी या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्या त्या कार्यकर्त्यांना सांगेन.
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, मी दीपक केसरकरांना सांगेन तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना समज द्या. राजकारण, निवडणुका ह्या फक्त दोन तारखेपर्यंत आहेत. पण कुठल्याही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये. आम्ही याबाबत काही गोष्टी सहन करणार नाहीत, हे लक्षात घ्या.. याचं उत्तर सावंतवाडीकर देणार आहेत. 2 तारखेला तुम्हाला जनता उत्तर देईल.. जनता बघत नाही असं नाही. जनतेला कळत नाही असं नाही. कोण कुठून कुठून मेसेज पाठवले जातायत?ते माहित आहे. त्या भाषा शिकण्यासाठी एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. मी तर बोलतो त्यांची मराठी चांगली आहे. शिकतायत, बोलतायत, ह्याचं कौतुक झालं पाहिजे. आज किती घरांमध्ये त्या स्वतः जातायत ते पाहा. दिवसातले शंभर, शंभर घर त्या फिरत आहेत.. सांगा मला कौतुक करायला पाहिजे की नको? असा सवालही नितेश राणे यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











