defender owner subhash bhosale : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या बैठका आणि आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू असताना त्यांच्या वापरातील एका डिफेंडर गाडीचीही चर्चा होत आहे. ही नवीकोरी डिफेंडर सांगोला तालुक्यातील प्रगत शेतकरी आणि सराफ व्यावसायिक सुभाष भोसले यांनी दिली आहे. गेल्या 15 दिवसांत ही गाडी घेतल्याचे भोसले यांनी सांगितले. मराठा समाजासाठी झटणाऱ्या जरांगे पाटील यांना लांबचा प्रवास करताना सुविधा मिळावी, या भावनेतून आपण ही गाडी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: 50,000 रुपये पगारात मुंबईत घर घेता येईल का? समजून घ्या पूर्ण गणित!
मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे दैवत - सुभाष भोसले
सुभाष भोसले यांनी सांगितले की, जरांगे पाटील मराठा समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी, फीमध्ये सवलत मिळण्यासाठी आणि नोकऱ्यांसाठी झटत आहेत. उपोषण आणि सततच्या प्रवासामुळे ते थकलेले असतात. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखरूप आणि आरामदायी व्हावा, यासाठी आपण त्यांना गाडी देण्याची विनंती केली. सुरुवातीला एवढी मोठी गाडी घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला होता. मात्र, आपण आग्रह केल्यानंतर त्यांनी गाडी वापरण्यास मान्यता दिल्याचे भोसले यांनी सांगितले. “आपण देवाला नवीन गाडी घेऊन जातो, त्याच भावनेने मी ही गाडी दिली. ते मराठा समाजाचे दैवत आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : ‘पळू नका, लपू नका; चर्चेला सामोरं जा!’ राहुल गांधींचं थेट नाव घेत अशोक चव्हाणांची पोस्ट अन्...
डिफेंडरची किंमत आहे तरी किती?
या डिफेंडरची किंमत 1 कोटी 90 लाख रुपये असल्याचे सुभाष भोसले यांनी सांगितले. गाडीवर अनेक लोक चढतील-उतरतील आणि त्यामुळे तिची अवस्था खराब होऊ शकते, याची जाणीव असूनही त्याबद्दल आपल्याला काहीही वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आपल्या व्यवसायामुळे आपल्याला समाजासाठी तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळे समाजासाठी झटणाऱ्या माणसाला फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून मदत करावी, या भावनेतून हे केलं,” असे भोसले म्हणाले. ते सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील असून त्यांचा सराफाचा व्यवसाय आणि शेती आहे. त्यांची सुमारे दहा एकर ऊसाची शेती असल्याचे त्यांनी सांगितले.
आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या ताफ्यात महागड्या गाड्या असल्याने टीका होते, त्याबाबतही सुभाष भोसले यांनी आपली भूमिका मांडली. प्रत्येक समाजात धनवान लोक असतात, मात्र मराठा समाजातही मोठ्या संख्येने गोरगरीब कुटुंबे आहेत. काही लोक कामासाठी जातात, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठा समाजातील काही लोक ऊसतोडीसाठीही जातात, असे ते म्हणाले. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळावे आणि नोकऱ्या मिळाव्यात, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. जरांगे पाटील यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहावे, सर्वांना कुणबी नोंदी मिळाव्यात आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारने सुरू असलेले काम वेगाने पूर्ण करून सर्वांच्या कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र निघाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT












