Jackfruit king mithilesh desai meets Narendra Modi : नवी दिल्लीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले. त्यापैकी पंतप्रधान मोदी एका तरुणाशी संवाद साधत असल्याचा फोटो आणि व्हिडीओ विशेष चर्चेत आहे. मोदींनी ज्या तरुणासोबत संवाद साधला, तो महाराष्ट्रातील युवा शेतकरी आणि ‘फणसकिंग’ आहे. मिथिलेश देसाई असं त्यांचं नाव आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : गळ्याभोवती तार गुंडाळून बलात्कार, सेक्युरिटी गार्डचं विद्यार्थीनीसोबत क्रूर कृत्य
कोण आहेत ‘फणसकिंग’ मिथिलेश देसाई?
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे येथे मिथिलेश देसाई यांची शेती आहे. ते बीटेक अॅग्रीकल्चर इंजिनिअर असून राहुरी कृषी विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांच्या वडिलांनी भारतात पहिल्यांदा फणसाची कमर्शियल पद्धतीने लागवड केली होती. मिथिलेश देसाई स्वतःच्या 28 एकरांच्या फार्मवर फणसाची लागवड करतात. त्यांची शेतकरी उत्पादक कंपनी 1500 एकरांवर शेतकऱ्यांसोबत फणसाच्या लागवडीचे काम करते. फणसासारख्या दुर्लक्षित पिकाला मुख्य पीक म्हणून पुढे आणण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
हेही वाचा : ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार 'ही' ज्येष्ठ अभिनेत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काय चर्चा झाली?
रेवती सुळे यांच्या रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मिथिलेश देसाई यांची सुमारे 10 ते 12 मिनिटे चर्चा झाली. या भेटीपूर्वी पवार साहेबांनी फणस आणि मिथिलेश यांच्या शेतीतील कामाबद्दल मोदींना माहिती दिली होती. त्यानंतर मोदींनी मिथिलेश यांना बोलावून घेतले आणि सुरुवातीला ‘आप कहाँ से हो?’ असा प्रश्न विचारला. त्यावर मिथिलेश यांनी आपण रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्रातून आलो असून फणसावर काम करणारा प्रगतिशील शेतकरी असल्याचे सांगितले. या संवादात त्यांनी फणसाची लागवड, प्रक्रिया, शाश्वतता, तंत्रज्ञान आणि ट्रेसेबिलिटी याबाबत माहिती दिली. फणसापासून तयार केलेली बॅग आणि पासपोर्ट होल्डर त्यांनी पंतप्रधानांना भेट दिला. हे दोन्ही फणसाच्या सालीपासून तयार करण्यात आले होते. त्यासोबतच कच्च्या फणसाच्या गरापासून तयार केलेली पावडर, फणसाच्या बिया आणि इतर उत्पादनेही त्यांनी दाखवली. बॅगमध्ये एनएफसी चिप लावण्यात आली होती. ती स्कॅन केल्यानंतर पंतप्रधानांच्या नावासह या उत्पादनाची ट्रेसेबिलिटी आणि शेतकऱ्याची माहिती समोर येत होती.
मिथिलेश यांनी मोदींना फणसाच्या विविध भागांच्या उपयोगाबाबतही माहिती दिली. भारतातील अनेक भागांमध्ये फणस उपलब्ध असून त्यातील मोठा हिस्सा वाया जात असल्याचे त्यांनी सांगितले. कच्च्या फणसाच्या गराची पावडर, फणसाच्या बियांची पावडर, सालीपासून तयार होणारे उत्पादन आणि फणसावर आधारित इतर प्रक्रिया उद्योग याबाबत त्यांनी माहिती दिली. फणसाच्या कच्च्या गराला व्हेगन मीटसाठी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. फणसाच्या पानांची जर्मनीला निर्यात केल्याचे त्यांनी नमूद केले. फणसाच्या प्रत्येक भागाचा वापर करता येत असल्याने त्याला ‘कल्पवृक्ष’ म्हणता येईल, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या मते, फणसावर प्रक्रिया केल्यास त्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवता येते. कच्च्या फणसापासून चिप्स, पावडर, बियांची पावडर आणि सालीपासून विविध उत्पादने तयार करण्याचे काम ते करत आहेत. 2020 मध्ये त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली असून फणसावर प्रक्रिया आणि संशोधन-विकासाच्या माध्यमातून काम सुरू ठेवले आहे.
मिथिलेश देसाई यांनी फणसाची लागवड, प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या उपक्रमांना पुढे नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. फणसासाठी महाराष्ट्रातील कोकण परिसरात प्रक्रिया केंद्र उभारण्यासोबतच भविष्यात उत्तर, ईशान्य, पूर्व आणि पश्चिम भारतात प्रक्रिया क्लस्टर उभारण्याची त्यांची योजना आहे. महाराष्ट्रातील विविध पिकांवर प्रक्रिया वाढण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, तरुणांनी शेतीमध्ये तंत्रज्ञान, नवीन कल्पना आणि प्रक्रिया उद्योगाचा वापर केला तर शेतमालाची मूल्यवृद्धी करता येऊ शकते. फणसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक मूल्य मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लांजा येथील त्यांच्या फार्मवर फणसासोबतच प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती घेण्यासाठी तरुण-तरुणी आणि शेतकरी येत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांसमोर ग्रामीण भागातील शेतकऱ्याला आपल्या कामाचे सादरीकरण करण्याची मिळालेली संधी ही अविस्मरणीय असल्याचे मिथिलेश यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT












