नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्यासह आणखी पाच खासदार शिंदे गटात जाणार असल्याचे वृत्त समोर येत असतानाच ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी विशेषत: खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करत या संपूर्ण घडामोडींना नवे राजकीय वळण दिले आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊतांचा थेट आरोप
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दावा केला की, ओमराजे निंबाळकर यांना शिंदे गटात आणण्यासाठी मोठी राजकीय डील करण्यात आली. त्यांनी आरोप केला की, निंबाळकर यांच्या वडिलांशी संबंधित एका न्यायालयीन प्रकरणाच्या निकालाचा वापर दबावाचे साधन म्हणून करण्यात आला आणि त्यातूनच हा राजकीय निर्णय घडवून आणण्यात आला.
हे ही वाचा>> Operation Tiger Live Updates : ठाकरे गटात फूट पक्की! 6 बंडखोर खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
राऊत म्हणाले की, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल हा काल (16 जून) लागणार होता. मात्र अचानक तो 20 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, याच गोष्टीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप ओमराजे निंबाळकरांवर केले आहे. ते म्हणाले 'पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल हा ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने लावू अशी ऑफर दिली गेल्याने त्यांनी आमची साथ सोडली. हा विचारांचा किंवा विकासाचा प्रश्न नाही. ही पूर्णपणे राजकीय डील आहे. सत्ता, दबाव आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचे खासदार तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.'
काय आहे 'ऑपरेशन टायगर'?
शिवसेना UBT पक्षाचे खासदार फोडाफोडीच्या या सगळ्या मोहिमेला "ऑपरेशन टायगर" असे नाव दिले गेले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील काही खासदार नाराज असल्याची माहिती समोर येत होती. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने या नाराज खासदारांना आता आपल्या गळाला लावलं असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा>> ओमराजे निंबाळकर कसे फुटले? कोणी केला मोठा गौप्यस्फोट?
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, केंद्र आणि राज्यातील सत्तेचा लाभ, आगामी निवडणुकांतील तिकीटांची हमी आणि संघटनात्मक ताकद यांचा आधार घेत काही खासदारांना शिंदे गटाकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ठाकरेंचे कोणते खासदार फुटले?
ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असले तरी ठाकरे गटातील एकूण 6 खासदार दिल्लीत असल्याची माहिती समोर आली आहे. या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे वेगळा गट स्थापन करण्यासाठी पत्रंही दिल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र संबंधित खासदारांकडून किंवा शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
ठाकरे गटाची चिंता वाढली
जर खरोखरच सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर लोकसभेतील ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. आधीच 2022 मधील शिवसेना फुटीनंतर पक्ष संघटनात्मक आणि राजकीय आव्हानांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत खासदारांची संभाव्य गळती हा ठाकरे गटासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
शिंदे गटाचे मौन
संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले असले तरी शिंदे गटाकडून त्यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. शिंदे समर्थक नेत्यांचे म्हणणे आहे की, अनेक लोकप्रतिनिधी स्वतःहून त्यांच्या संपर्कात आहेत आणि विकासाच्या राजकारणासाठी ते शिवसेनेत येऊ इच्छित आहेत.
या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संबंधित खासदार प्रत्यक्षात शिंदे गटात प्रवेश करतात का, याची अधिकृत घोषणा कधी होते आणि संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना शिंदे गट काय उत्तर देतो, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील. मात्र "ऑपरेशन टायगर"च्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष तीव्र झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
ADVERTISEMENT











