Jalna Municipal Corporation Election : जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या प्रभाग क्रमांक 10 मधील एका मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचं समोर आलंय. मतदानाच्या दिवशीच सरकारी कर्मचारी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेल्या आपल्या आईचा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या वादातून थेट मतदान केंद्रातच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT
या प्रकरणात अपक्ष महिला उमेदवाराच्या पतीने थेट मतदान केंद्रात येऊन संबंधित सरकारी कर्मचाऱ्याला केंद्राबाहेर ओढत नेल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे मतदान केंद्रात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. उपस्थित मतदारांमध्येही घबराट पसरली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, इमरान खान इनायद खान असं या सरकारी कर्मचाऱ्याचं नाव असून, त्यांची आई काँग्रेसकडून जालना महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार आहे. इमरान खान हे सरकारी सेवेत कार्यरत असतानाही मतदान केंद्राच्या परिसरात आपल्या आईच्या प्रचारात सक्रिय असल्याचा आरोप अपक्ष महिला उमेदवाराच्या पती कलीम खान यांनी केला आहे.
कलीम खान यांनी आरोप केला की, मतदान केंद्रात येणाऱ्या मतदारांशी संवाद साधत इमरान खान आपल्या आईच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन करत होते. सरकारी कर्मचारी असल्याने निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा दावा करत कलीम खान यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि संतप्त झालेल्या कलीम खान यांनी इमरान खान यांना मतदान केंद्राबाहेर ओढत नेल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर मतदान केंद्रात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. मतदारांनीही मतदान थांबवून परिस्थितीकडे लक्ष दिलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच मतदान केंद्राच्या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला.
या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे प्रचारात सहभागी होऊ नये, असे स्पष्ट नियम असतानाही असा प्रकार घडल्याने निवडणूक प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मात्र या घटनेची चर्चा जालना शहरात आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT










