Manoj Jarange Patil, बीड / जालना; योगेश काशीद : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची नावे अमोल खुणे आणि दादा गरुड अशी आहेत. विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेला अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
मनोज जरांगेंना जीवे मारण्याच्या कटात परळीतील नेत्याचा सहभाग?
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, परळीतील एका नेत्याने काही कोटी रुपयांची ऑफर देत जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, जरांगे यांचे निकटवर्तीय आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. काळकुटे यांनी स्वतः बीडचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. “या विषयावर मी कोणतेही भाष्य करणार नाही; मनोज जरांगे पाटीलच अधिकृत भूमिका मांडतील,” असे गंगाधर काळकुटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण चळवळ गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात गाजत आहे. त्यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला असताना, आता त्यांच्या जीवावरचा कट उघड झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पोलिसांनी या कटामागील सूत्रधार कोण आहे आणि परळीतील नेत्याची नेमकी भूमिका काय, याचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, जालना पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत निवेदन सादर केले असून, सुरक्षा वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ माजली असून, मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











