नवी दिल्ली: महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच दिवशी दिल्ली दौऱ्यावर आहेत. बुधवारी (6 ऑगस्ट) एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तर उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीआधी प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, या सगळ्यामुळे दिल्लीत सुरू झालेल्या हालचालींनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मंगळवारीरात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचले आणि बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.
हे ही वाचा>> Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा होणार राजकीय भूकंप? एकनाथ शिंदे दिल्लीत, रिव्हर्स ऑपरेशन लोट्स अन्...
नेमकं काय राजकारण आहे सुरू?
एकनाथ शिंदे यांचा हा आठवडाभरातील दुसरा दिल्ली दौरा आहे. काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतल्याची चर्चा होती. बुधवारी एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतलाी. या बैठकांमध्ये राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती समजते आहे. याशिवाय, शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी प्रलंबित आहे. या सगळ्या घटामोडीबाबत एकनाथ शिंदे यांची वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहेत.
उद्धव ठाकरे देखील दिल्लीत
दुसरीकडे, शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बुधवारी दिल्लीत पोहोचले. ते दिल्लीत तीन दिवस असून इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज (7 ऑगस्ट) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या दुपारच्या जेवणाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. संसद अधिवेशन, राज्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या खासदारांसोबत स्वतंत्र बैठक घेणार आहेत. दोन्ही शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचा जवळजवळ एकाच वेळी दिल्ली दौरा हा राज्यातील राजकीय समीकरणात मोठ्या बदलाचे स्पष्ट संकेत असल्याचं बोललं जात आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपशी असलेले शिंदे गट आपले संबंध मजबूत करत असताना, विरोधी आघाडीत ठाकरे गट आपले स्थान आणखी मजबूत करण्याची तयारी करत आहे.
हे ही वाचा>> 'दम असेल तर PM मोदींनी म्हणावं ट्रम्प खोटारडे आहेत..', राहुल गांधींचं थेट आव्हान
दुसरीकडे राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मर्यादित ठेवण्यासाठी भाजपकडून शिवसेना (UBT)यांना सध्या काही प्रमाणात सॉफ्ट कॉर्नर मिळत आहे. ज्यामुळे शिंदेच्या पक्षात बरीच अस्वस्थता पसरली आहे. या सगळ्याबाबत देखील एकनाथ शिंदेंनी मोदी-शाह यांच्याशी चर्चा केली असण्याची दाट शक्यता आहे.
ठाकरे आणि शिंदेंची एकमेकांवर टीका
काँग्रेसशी जवळीक साधल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली आणि म्हटले की, 'काही लोक 10 जनपथचा मार्ग निवडत आहेत, तर आम्ही जनहिताचा मार्ग निवडला आहे.' तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील बोचऱ्या शब्दात एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 'ते दिल्लीत आपल्याला मालकांना भेटायला आले आहेत. त्यांचे मालक हे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते इथे येतात.' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दोन्ही नेत्यांचे दिल्ली दौरे औपचारिक नाही!
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचे दिल्ली दौरे हे केवळ औपचारिक नाहीत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन नवीन युती आणि जागावाटपाबाबतच्या सखोल रणनीतीचा देखील हा भाग आहे.
दोन्ही आघाडींमध्ये अंतर्गत संघर्ष
आर्थिक वाटप, मंत्रिपदाचा वाद आणि अधिकार क्षेत्राबाबत राज्यातील महायुती आघाडीत अंतर्गत असंतोष आहे. तर समन्वयाचा अभाव आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची राज ठाकरेंशी वाढती जवळीक यामुळे महाविकास आघाडीला नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ठाकरे आणि शिंदे दोघेही त्यांच्या दिल्ली भेटीद्वारे राष्ट्रीय पातळीवर त्यांचे राजकीय स्थान दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघेही आपापल्या पक्षात निर्णायक भूमिका बजावू शकतात हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे.
ADVERTISEMENT
