Pune Metro | NCP मध्ये खऱ्या अर्थाने 'पार्थ पर्व'ला सुरुवात; काकडेंच्या उमेदवारीची Inside Story

Pune Metro : पुणे विधान परिषद निवडणुकीत विक्रम काकडे यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार यांच्या वाढत्या प्रभावाची चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयामागील राजकीय घडामोडी, मैत्रीचे समीकरण आणि पक्षांतर्गत चर्चांचा आढावा.

Pune Metro

Pune Metro

मुंबई तक

02 Jun 2026 (अपडेटेड: 02 Jun 2026, 10:34 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Pune Metro | NCP मध्ये खऱ्या अर्थाने 'पार्थ पर्व'ला सुरुवात

point

काकडेंच्या उमेदवारीची Inside Story

Pune Metro : पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी विक्रम काकडे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागेवरून देण्यात आल्याने या निर्णयामागे नेमके कोणते राजकीय गणित कार्यरत होते, याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे उमेदवारी मिळवण्यासाठी विक्रम काकडे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. 

हे वाचलं का?

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पार्थ पवार यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पार्थ पवार यांचे स्वतंत्र राजकीय पर्व सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हेही वाचा : सांगली : वरिष्ठ लिपिकाची महिला सहकाऱ्याकडे नको ती मागणी, एसटी विभागीय कार्यालयात काय घडलं?

जिजाई बंगल्यावरील बैठकीत काय घडलं? 

उमेदवारी निश्चित करण्यापूर्वी पुण्यातील जिजाई बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विविध नेत्यांबरोबरच सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची उपस्थिती होती. बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाल्यानंतर विक्रम काकडे यांच्या नावाला अंतिम मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, एकीकडे विक्रम काकडे यांच्या नावाची घोषणा झालेली असतानाही सुनील टिंगरे यांनी अर्ज भरण्यासाठी जात असल्याचे सांगितल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र नंतर दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, टिंगरे हे डमी उमेदवार असून विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार असतील. त्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.

हेही वाचा :  Maharashtra Weather : वारं फिरलं, राज्याच्या दिशेनं घोंगावणार संकट, 23 जिल्ह्यांना मोठा अलर्ट

कार्यकर्त्यांना डावलून मित्राला संधी दिल्याची चर्चा 

या निर्णयामागे केवळ राजकीय समीकरणे नसून वैयक्तिक मैत्रीचाही मोठा भाग असल्याची चर्चा आहे. पार्थ पवार आणि विक्रम काकडे यांची दीर्घकाळापासूनची जवळीक असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे पार्थ पवार स्वतःची नवी राजकीय टीम उभी करत असताना काकडे यांना संधी मिळणे हे त्याचाच एक भाग मानले जात आहे. यापूर्वीही विक्रम काकडे यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेसाठी झाली होती. मात्र इतर राजकीय कारणांमुळे तेव्हा त्यांना संधी मिळाली नव्हती. आता मात्र परिस्थिती बदलली आणि अखेर त्यांची निवड निश्चित झाली. यामुळे पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचेही बोलले जात आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून मित्राला संधी दिल्याचा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेत संजय काकडे यांची मध्यस्थीही महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जाते. पुण्यातील जागेवर भाजप स्वतःचा दावा सोडण्यास तयार नसल्याची चर्चा असतानाच विविध स्तरांवर चर्चा आणि समन्वय साधण्यात आला. त्यानंतर विक्रम काकडे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार यांचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र दिसत असले, तरी त्याचे दीर्घकालीन राजकीय परिणाम काय होतील हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. विक्रम काकडे यांची निवड ही केवळ एका उमेदवाराची निवड नसून पक्षातील बदलत्या सत्ताकेंद्रांचा संकेत मानला जात आहे.