मंत्री शंभुराज देसाईंचं रक्त काढलं, मराठा आंदोलन लाठीमार अन् बिद्रे प्रकरणातही आरोप आणि दोशी?

मंत्री शंभुराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आल्यानंतर साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी हे अचानक चर्चेत आले आहेत. जाणून घ्या त्यांच्याविषयी सविस्तरपणे.

Mumbai Tak

फाइल फोटो

निलेश झालटे

• 08:00 AM • 24 Mar 2026

follow google news

सातारा: 'तो एसपी जे वागलाय ना तो घर गड्यासारखा वागलाय, त्याला तात्काळ निलंबित करा. त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत चौकशी करण्याची मागणी करा आणि अरेरावी करणाऱ्या तुषार दोषीला निलंबित करा' अशी मागणी दुसरं तिसरं कुणी नाही तर एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानं केली, कुठं केली तर राज्याच्या सर्वोच्च सभागृहात. हे पालकमंत्री म्हणजे शंभूराज देसाई आणि ते एसपी म्हणजे तुषार दोशी. या जिल्हा पोलीस अधीक्षक असणाऱ्या तुषार दोशींची कारकीर्दच वादग्रस्त आहे. आपल्याला अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण आठवतंय, या प्रकरणापासून ते पुढे मराठा आंदोलकांवरील पहिला लाठीचार्ज ते साताऱ्यातील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण ते साताऱ्यातलंच गाजलेलं ड्रग्ज प्रकरण आणि आता झेडपी अध्यक्षपदासाठीचा ड्रामा यामध्ये तुषार दोषींवर गंभीर आरोप झालेत.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

या प्रत्येक प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली मात्र ते प्रत्येक वेळी कारवाईपासून वाचल्याचेच दिसून आले. आता मात्र अधिवेशनात मुद्दा गाजल्यानं आणि थेट पालकमंत्र्यांवरच हात घातला असल्यानं दोशींवर कारवाईची चिन्हं निर्माण झाली आहेत. याच तुषार दोशींची वादग्रस्त कारकीर्द जाणून घेऊया 

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडून पालकमंत्री शंभुराज देसाईंना धक्काबुक्की झाली, अगदी रक्त निघेपर्यंत. याप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवण्यात आला. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री आमदार आक्रमक झाले, यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापतींनी तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश दिले. निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करताना तुषार दोशींच्या या आधीच्या कारकीर्दीचीही चौकशी केली जावी, अशी मागणीच शंभुराज देसाई यांनी केली. अर्थात नंतर निलंबनाच्या आदेशाला राम शिंदेंनी हा निलंबनाचा निर्णय राखीव ठेवत स्थगितीच दिली आहे असं म्हणावं लागेल. असो हे राजकारण चालत राहिल. मात्र यामध्ये तुषार दोशींची वादग्रस्त कारकीर्द चर्चेत आली आहे.

हे ही वाचा>> 'मागील जन्मात तु अप्सरा होतीस, घटस्फोटानंतर दुसरं लग्न करेन...', भोंदू बाबा अशोक खरातचं आणखी एक कांड

एसपी तुषार दोशी हे मूळचे रायगडच्या महाडचे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले,  2000 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाली. पहिली पोस्टिंग चंद्रपूर नंतर लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, आणि नंतर जालन्यात काम केलं. 2014 ला आयपीएस म्हणून प्रमोशन झालं. पोलीस अधीक्षक म्हणून पुणे, जालना, रेल्वे पुणे असं काम त्यांनी केलं. पुण्याहून ते सातारा एसपी झाले. आता सातारा एसपी म्हणून आल्यानंतर ते सतत चर्चेत आले. याचं कारण तीन मुख्य प्रकरणं, पहिलं महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण दुसरं सातारा ड्रग्ज प्रकरण आणि तिसरं आताचा झेडपीचा राडा. 

फलटणमधील महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याचं प्रकरण चांगलंच गाजलेलं. यावेळी सुषमा अंधारेंनी आवाज उठवलेला. या प्रकरणात अंधारेंनी दोशींवर गंभीर आरोप केलेले. ''रुपाली चाकणकरांनी त्या महिलेचे चॅट्स कसे जाहीर केले? आणि त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या एसपी तुषार दोशींनी त्यांना का अडवलं नाही?” असा सवाल करत अंधारेंनी दोशींवर थेट चारित्र्यहननाचा आरोप केला होता. 'तुषार दोशी हे नावाप्रमाणे वागले आणि त्यांनी मृत डॉक्टरचे ठरवून चारित्र्यहनन केलं का?' असंही अंधारे म्हणालेल्या.

हे ही वाचा>> 'अशोक खरातला भेटलेल्या लोकांची HIV टेस्ट करा, नाहीतर सगळे मरतील', बड्या नेत्याची थेट विधानसभेत मागणी

या प्रकरणात विरोधी पक्षातील नेत्यांनीही दोशींवर आरोप केलेले. त्यानंतर सातारा ड्रग्ज प्रकरणातही दोशींवर आरोप झालेले.  ज्या ठिकाणी ड्रग्ज सापडले त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून जेवण जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती लपवून ठेवली असा आरोप त्यांनी केलेला. पोलिसांनी याठिकाणी कारवाई केली पण ड्रग्जशी संबंधित ज्या तीन लोकांची नावं एफआयआरमध्ये असायला पाहिजे होती, ती नाहीत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. ड्रग्ज प्रकरणात शिंदेंसह गृहविभाग असलेल्या फडणवीसांवरही विरोधकांनी टीकास्त्र सोडलेलं. हे प्रकरण देखील दोशी हाताळत होते. 

आणि आता सातारा झेडपीतील हा राडा. पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा बॉस अशीच एकंदरीत प्रतिमा असते, सगळं प्रशासन त्यांच्या इशाऱ्यावर काम करत असतं, त्याच पोलीस प्रशासनाकडून देसाईंना धक्काबुक्की झाली अगदी रक्त निघेपर्यंत.
या संपूर्ण राड्याच्या केंद्रस्थानी एकच नाव आहे, ते म्हणजे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी. आता या प्रकरणात त्यांचं निलंबन होईल का हा खरंतर सवालच आहे.

बरं साताऱ्यात येण्याआधीही दोशी आणि वाद हे समीकरण होतंच. यात सर्वात लक्षवेधी ठरलं ते प्रकरण म्हणजे अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज. तुषार दोशींवर अंतरवाली सराटीच्या लाठीमारामुळे ठपका ठेवला होता. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुष लाठीमार केला असल्याचा आरोप झाला होता. त्यांमुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळालं होते. त्यानंतर, या सर्व प्रकरणाची गृह विभागाने गंभीर दखल घेत जालना पोलीस अधीक्षक तुषार दोशी (IPS Tushar Doshi) यांच्यावर पहिली कारवाई केली होती. पोलीस अधीक्षक दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश गृह विभागाने काढले होते. नंतर दोशी यांची जालना येथून बदली करण्यात आली होती. पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी ते गेले होते, तिथून लोहमार्ग पोलिसला गेले आणि नंतर लगेच साताऱ्याचे एसपी झाले. 

बरं राज्यभर गाजलेल्या बिद्रे हत्याकांडामध्येही तुषार दोशींवर आरोप झालेले. 'या प्रकरणाच्या तपासात याच तुषार दोशी यांनी आरोपी अभय कुरुंदकर याला मदत केली होती', असा आरोप बिद्रेंचे पती राजू गोरेंनी केलेले. 'आम्ही त्यांची तक्रार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु आश्चर्यकारकरित्या त्यांना पुढे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले', असं गोरे म्हणालेले. 

विशेष गोष्ट बघा, अंतरवालीतील लाठीचार्जनंतर दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यानंतर दोशी यांचा बदल्यांचा खेळ सुरू झाला. सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर दोशी यांची जालन्यातून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली. पण, तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानंतर दोशी यांची पुणे लोहमार्ग अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती आणि इथून दोशी साताऱ्याला गेले. आणि याच साताऱ्यात दोशी आणि त्यांच्या नेतृत्वातील पोलीस कर्मचाऱ्यांवर शिंदेंचे खासमखास असलेले मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की केल्याचे आरोप होत आहेत.

अर्थात एवढे आरोप होऊनही तुषार दोशी मुख्य प्रवाहात काम करतात, त्यांच्या अनेक कामांचं कौतुकही होताना दिसतंय शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या पदांवर ते काम करतानाही दिसतात. शिवाय चांगल्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकसुद्धा मिळालंय. अशात नीलम गोऱ्हेंनी दोशींचं निलंबन जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासातच ते निलंबन होल्डवर पडलंय. त्यामुळं आता या प्रकरणात गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दोशींवर खरंच काही कारवाई होतेय का आणि खरंच या प्रकरणात ते दोषी आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.