मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (10 जुलै) अचानक दिल्ली दौरा केला. ज्यावरून राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच आता शिवसेना (UBT)नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान करून प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. 'गुरूपौर्णिमेच्या दिवशी शिंदेंनी दिल्लीत जाऊन अमित शाहांचे पाय धुतले, चंदन लावलं.. आणि नंतर सांगितलं आता मला मुख्यमंत्री करा..' असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंच्या दिल्लीवारीवरून बरीच टीका केली
ADVERTISEMENT
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदेनी अमित शाहांचे पाय धुतले आणि चंदन लावून चाफ्याची फुलं वाहिली...'
'मुळात शिंदे हे पात्र आहे किंवा जो गट आहे.. तो या लोकांनी निर्माण केलं आहे. त्यांचे आदेश त्यांना पाळावेच लागतात. ते (शिंदे) काय शिवसेनाप्रमुखांच्या समाधी स्थळी जाऊन कौल लावत नाहीत.. की, आता काय करायचं? त्यामुळे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने 100 टक्के दिल्लीला जाणारच होते त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता.'
हे ही वाचा>> 'श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस', शिरसाट बोलून गेले... अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला.. तुम्हाला क्रोनोलॉजी समजली का?
'मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ती अधिकृत माहिती देतो. यापूर्वी देखील मी त्यांच्या दिल्ली भेटीवर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी गुरूपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं. त्यांचं काय ते पाय धुण्याचं, फुलं.. पूजा-अर्चा. त्यानुसार कृष्ण मेनन मार्गावर अन्यत्र ते गेले. त्यांनी पूजा अर्चा केली अमित शहांची.. गुरू म्हणून.'
'त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली. मी सांगतो... त्यांच्या दोन्ही पायाला चंदन लावलं. हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. ते इतरही नेत्यांना भेटले.' अशा बोचऱ्या शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
'आता मला मुख्यमंत्री करा असं शिंदेंनी शाहांना सांगितलं'
'यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे. की, ते आमची कोंडी करतात, काम करू देत नाही. ते आम्हाला अडचणीत आणत आहेत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्या आहेत. अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता. त्यानंतर त्यांनी स्वत: एक अशी ऑफर ठेवली की, आता परत महाराष्ट्रात मराठी माणसांची जी एकजूट झाली आहे ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल.'
'काही करून ही जी एकजूट होते त्यामध्ये तुम्हाला लक्ष घालावं लागेल. ही मराठी माणसाची एकजूट कशी तोडता आली नाही तर राजकीयदृष्ट्या फार मोठं नुकसान होईल. यावर त्या दोघांनी चर्चा केली..'
हे ही वाचा>> 'आम्ही मिटवून टाकली भांडणं, आलो ना दोघं भाऊ एकत्र...' उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, पण...
'यावर अमित शाहांनी विचारलं की, शिंदेजी आपके मन मै क्या है? तेव्हा शिंदे म्हणाले, मला मुख्यमंत्री करणं हा त्यावरचा उपाय आहे. मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर या सगळ्या गोष्टी थांबवेन. ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला स्थैर्य लाभेल. हे त्यांनी अमित शाहांना सांगितलं.' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
शिंदेंचा गट भाजपमध्ये विलीन होण्यासाठी तयार...
'मला मुख्यमंत्री करा.. आणि परत अमित शाह म्हणाले की, मुख्यमंत्री अब भाजपका ही होगा.. त्यावर त्यांनी सांगितलं की, मी माझ्या गटासह भाजपमध्ये विलीन व्हायला तयार आहे. पण मला मुख्यमंत्री करा. ही त्यांची जी भूमिका आहे. ही त्यांनी वारंवार याआधी सांगितली आहे.'
'ते खूपच हातघाईवर आले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, मी माझा जो काही गट आहे जो तुम्ही स्थापन केला होता तो मी विलीन करतो. पण मला मुख्यमंत्री करा. असा नेता मी याआधी पाहिला नाही.'
'वारंवार दिल्लीत जाणं, दिल्लीपुढे नाक घासणं.. हे प्रकार आधी झालेले आहेत. काँग्रेसच्या राजवाटीतसुद्धा दिल्लीतून सगळ्या हालचाली होत होत्या. पण स्वत:ला शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांनी, स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे अस्सल वारसदार म्हणवणारे अशा प्रकारची विधानं करणं.. खासगीत असतील किंवा बाहेर असेल.. किंवा जाऊन दिल्लीतील राज्यकर्त्यांसमोर झुकणं. हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे.'
'मी जे बोलतोय ते 100 टक्के सत्य आहे. सांगतो ते 100 टक्के सत्य आहे. नसेल सत्य तर त्यांनी माझ्याशी प्रतिवाद करावा. हे असंच घडलेलं आहे.' असं आव्हानच संजय राऊत यांनी यावेळी दिलं आहे.
'ऑगस्टमध्ये मोठ्या घडामोडी, राज्यात राजकारणात उलथापालथी होणार'
'शिंदे यांच्या काही लोकांवर भविष्यात नक्कीच कारवाया होणार आहेत. त्या प्रकारचे अस्सल पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. यापुढे त्यांना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत मला कमी होताना दिसत आहेत. शिंदेपेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे.'
'केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत सुद्धा मला माहिती आहे. आयकर खात्याची नोटीस ही काही मी गांभीर्याने घेत नाही. हा फक्त इशारा आहे. यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घडतील असे मला संकेत आहेत. या राज्याच्या राजकारणात त्यामुळे मोठी उलथापालथ होऊ शकेल.'
'एक तर तुम्हाला संपूर्ण शरणागत होऊन या सत्तेमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यासारखं राहावं लागेल. नाहीतर तुम्हाला इतर अनेक गोष्टीत तडजोड करावी लागते. ही सध्याच्या राजकारणाची स्थिती आहे.'
'मला वाटत नाही की, एखाद दुसरा कोणी नेता वगळता.. एकनाथ शिंदे यांना याक्षणी कोणी संरक्षण देत असेल.' असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
