Raj Thackeray: 'याचा त्रास आपल्याला निश्चित होणार...', राज ठाकरेंनी ओळखला 'तो' धोका?

मुंबई तक

• 10:03 PM • 19 Mar 2026

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील भाषणात इराण हल्ल्यावर भाष्य करत थेट पंतप्रधान मोदींना एक सल्ला दिला आहे. पाहा आपल्या भाषणात ते नेमकं काय म्हणाले.

we did not stand behind iran during troubles this surely trouble india in future mns chief raj thackeray criticism modi government

फोटो सौजन्य: MNS Adhikrut

Google CTA

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (19 मार्च) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात इराण-इस्रायल युद्धावर जोरदार भाष्य करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खडे बोल सुनावले. “इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता. त्या इराणवर ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, ते पाहता आपण इराणला साथ द्यायला हवी होती,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. देशात एलपीजी गॅसच्या भीषण टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला इराण युद्धाला जबाबदार धरत भविष्यात भारताला याचा निश्चित त्रास होणार असल्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिला. 

हे वाचलं का?

भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी मध्य पूर्वातील युद्धावर वक्तव्य केलं. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि खामेनेई कुटुंबातील सदस्यही मारले गेले. त्यानंतर इराणने इस्रायल आणि आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. दक्षिण पार्स गॅस फील्डसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले झाल्याने जगभरातील ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला. याचा थेट परिणाम भारतावर झाला आहे. पण आतापर्यंत इराण अनेकदा भारताच्या बाजूने असतानाही अशा परिस्थितीत भारताने इराणला पाठिंबा न दिल्याने राज ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली. 

'आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती...', पाहा राज ठाकरे काय म्हणाले

राज ठाकरे म्हणाले, “देशातही आज धाकधूक सुरू आहे, भीषण परिस्थिती आहे. गॅस मिळत नाहीये. नेहमी नॉर्मलवर असणारी लोकं गॅसवर आहेत.“ इराणकडून भारताला रुपयांमध्ये तेल पुरवठा होत असल्याची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले की, “आपल्या देशामध्ये येणारं तेल हे इराणमधून येतं. ते आपल्याला रुपयामध्ये देतात, देत आले. पण खामेनेईंच्या मृत्यूनंतर आणि इराणवर हल्ले झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ना निषेधाचे विधान केले, ना श्रद्धांजलीसाठी तातडीने प्रतिक्रिया दिली. काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांकडून राहून गेल्या,” असे ठाकरे म्हणाले. “इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही. हल्ल्यावर कुठचं विधान केलं नाही,” अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा>> 'सरकारने टेलिव्हिजन वाल्यांची वाट लावली, सतत दबाव या बातम्या नको...' राज ठाकरेंनी गाजवली सभा, सरकारला धारेवर धरलं

इराणने जम्मू-काश्मीर मुद्द्यावर भारताला पाठिंबा दिल्याची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले, “जो देश आजपर्यंत जम्मू-काश्मिरच्या प्रश्नावर देखील आपल्या पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला.. त्यांच्या अडचणीच्या काळात आपण उभे राहिलो नाही. याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला.” 

इराण युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील वाहतूक ठप्प झाल्याने भारतातील एलपीजी आयात 60 टक्के प्रभावित झाली आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात एलपीजी विक्री 17 टक्क्यांनी घसरली. घरगुती आणि व्यावसायिक वापरकर्ते गॅस टंचाईला तोंड देत आहेत. केंद्र सरकारने घरगुती पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे.

हे ही वाचा>> खामेनी, मुलगी-जावई-सून, टॉप कमांडर...इस्त्राईल आणि अमेरिकेने टिपून-टिपून मारले

राज ठाकरे यांनी मेळाव्यात आणखीही मुद्दे उपस्थित केले. देशातील नागरिकांना ‘मोबाइल आणि इन्स्टाग्राम’मधून बाहेर येण्याचे आवाहन करत, “आज संपूर्ण देशाला करमणुकीत गुंतवून ठेवलं आहे. आयपीएल सुरु आहे,” असे म्हटले. मात्र, इराण मुद्द्यावर त्यांचे भाष्य सर्वाधिक चर्चिले जात आहे. मनसेने ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिला गुढीपाडवा मेळावा आयोजित केला होता.

सध्या इराण-इस्रायल संघर्ष तीव्र आहे. आजच इराणने तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला केला, तर इस्रायलने इराणच्या गॅस क्षेत्रावर हल्ले केले. भारताने आतापर्यंत तटस्थ भूमिका घेतली आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या भाषणाने ‘इराणशी ऐतिहासिक संबंध’ आणि ‘भविष्यातील ऊर्जा संकट’ याकडे लक्ष वेधले आहे. देशातील गॅस टंचाईमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि परराष्ट्र धोरणातील ‘मौन’ यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.