
मुंबई : शिवसेनेतील शिंदे-ठाकरे गटामध्ये मध्यरात्री प्रभादेवीमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी काल रात्री गोळीबार केल्याचा आरोपही सुनील शिंदे यांनी केला आहे. यामुळे जसा आमच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखला झाला तसा त्यांच्यावरतीही झाला पाहिजे, अशी मागणी अरविंद सावंत यांच्यावतीनं पोलिसांकडे करण्यात आली आहे.
रात्री झालेल्या राड्यादरम्यान सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप होत आहे. त्यामध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सदा सरवणकर यांनी खरच गोळीबार केला का? याचा तपास पोलीस करणार आहेत. महेश सावंत या गोळीबारात थोडक्यात बचावले असल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अरविंद सावंत यांनीही शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील असं आश्वसनही सावंतांनी शिवसैनिकांना दिलं आहे.
संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी प्रभादेवी जंक्शन येथे शिंदे गटाच्यावतीने गणेश भक्तांसाठी पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता. त्याच्या शेजारी ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांनीही स्टॉल लावला होता. त्यावेळी दोघांमध्ये वादची ठिणगी पडली होती. त्यावेळी हा मिटवण्यात आला होता. मात्र, महेश सावंत यांनी राग मनात ठेवून रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हल्ला केला.
महेश सावंत यांच्यासह शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, विपुल ताटकर, यशवंत विचले आणि 20 ते 25 कार्यकर्ते बांबू, चॉपर, लाठ्या काठ्यांसह आले. शिविगाळ करत अंगावर धावून आले आणि आपल्याला मारहाण केली. यावेळी, पोलीस आल्यानंतर झालेल्या धावपळीत गळ्यातील 30 ग्रॅम सोन्याची चैन, पंचमुखी रुद्राक्षासह पळवून नेली, असाही आरोप तेलवणे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.