शिंदे गट महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवण्याच्या तयारीत?; राड्यावर 'सामना'त काय म्हटलंय?

Maharashtra Assembly session : विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मांडली भूमिका
MVA and Shinde group MLAs clash outside Maharashtra Assembly
MVA and Shinde group MLAs clash outside Maharashtra Assembly

बंडखोरी करून मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेसह शिंदे गटातील आमदारांना शिवसेना 'सामना'तून सातत्यानं लक्ष्य करत आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा झाला. यावरून आता शिवसेनेनं शिंदे गटावर टीकेचे बाण डागले आहेत. भरत गोगावले यांनी केलेल्या विधानावरही शिवसेनेनं बोट ठेवलं असून, गुवाहाटीफेम सिनेमा महाराष्ट्र डब्यात घालेल, असा इशारा दिला आहे.

शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावरूनच पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदार त्यांच्याविरुद्ध ५० खोके एकदम ओके, ताट-वाटी चलो गुवाहाटी, ५० खोके खाऊन खाऊन माजलेत बोके, अशी घोषणाबाजी केली जातेय. त्यातूनच बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा झाला.

या राड्यावर भाष्य करताना शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य करताना म्हटलंय की, "विश्वासघात करून जन्माला आलेलं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून सनदशीर मार्गाने कारभार चालवण्यापेक्षा धमक्या व मारहाणीसारखे गुंडगिरीचे प्रकार अंमळ अधिकच वाढले आहेत. बुधवारी विधिमंडळाच्या आवारातही नेमके हेच घडले. सत्तारूढ व विरोधी आमदारांमध्ये अभूतपूर्व धुमश्चक्री झाली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आधी घोषणायुद्ध झाले व त्याचे पर्यवसान आधी हमरीतुमरी आणि नंतर धक्काबुक्कीमध्ये झाले. विधिमंडळाच्या आवारात आजवर कधीही घडली नाही अशी ही लाजिरवाणी घटना साऱ्या महाराष्ट्राने पाहिली."

MVA and Shinde group MLAs clash outside Maharashtra Assembly
सुप्रिया सुळेंनी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची थेट अमित शाहांकडे केली तक्रार

पुढे शिवसेना म्हणते, "राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जबरदस्त धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंचे एकेरीवर तर आलेच; मग मोठी गुद्दागुद्दीही झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संयमाने परिस्थिती हाताळली म्हणून पुढील भयंकर प्रकार टळला अन्यथा विधिमंडळाच्या आवारात काय घडले असते हे कोणीच सांगू शकणार नाही. असभ्य शब्दांचा वापर, अर्वाच्य शिवीगाळ आणि खेचाखेची व धक्काबुक्कीची ही घटना पाहून विधान भवनाच्या निर्जीव भिंतींनीही नक्कीच अश्रू ढाळले असतील", अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली.

MVA and Shinde group MLAs clash outside Maharashtra Assembly
देवेंद्र फडणवीसांना 'वेटिंग सीएम' का ठेवलं? विचारत जयंत पाटील यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

भरत गोगावले यांच्यावर शिवसेनेची टीका

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी राड्यानंतर बोलताना आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली. हा तर ट्रेलर होता, पिक्चर बाकी आहे, असं विधान केलं. त्यावर शिवसेनेनं म्हटलं आहे, "पुन्हा आश्चर्य असे की, एवढे सगळे केल्यानंतर सत्तारूढ शिंदे गटाच्या एका आमदाराने थेट मीडियाशी बोलताना ‘ये तो एक ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है’, अशी धमकीच दिली. याला सत्तेचा माज नाहीतर काय म्हणायचे!"

"दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेवर असलेल्यांचे सध्या एकच धोरण आहे. एकतर विरोधकांना देशाचे शत्रू ठरवायचे, बोली लावून त्यांना खरेदी करायचे आणि ऐकलेच नाही तर फुटकळ प्रकरणात चौकशा लावून त्यांना तुरुंगात डांबायचे. विरोधकांचा आवाज दडपण्याचा देशाच्या राजधानीतून आलेला हा साथीचा आजार आता गुजरात-आसाम रिटर्न सरकार महाराष्ट्राच्या सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या राजधानीतही पसरला नसता तरच नवल!", असं म्हणत शिवसेनेनं राज्यातील शिंदे सरकारबरोबरच दिल्लीतील मोदी सरकारलाही खडेबोल सुनावले.

"विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांकडून जी धुमश्चक्री घडवली गेली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती अशी की, सुरळीत राज्यकारभार करण्यावर या सरकारचा विश्वास दिसत नाही. संसदीय लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक वगैरे शब्दांशी सपशेल फारकत घेऊन गोंधळ करण्यावरच भर द्यायचा, असे धोरण तर गुवाहाटी फेम सरकारने आखले नाही ना, अशी शंका आता विरोधकांनाच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेलाही येऊ लागली आहे", असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

शिंदे गट महाराष्ट्राला कोणता पिक्चर दाखवणार आहे? -शिवसेना

"महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक समृद्ध अशी राजकीय परंपरा आहे; पण ही मौलिक परंपरा पायदळी तुडवतानाचे दृश्य बुधवारी साऱ्या जगाने बघितले. सत्तारूढ शिंदे गटाने विधिमंडळाच्या आवारात घडवलेल्या धुमश्चक्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. त्यानंतरही ‘ये तो एक ट्रेलर था,’ अशी धमकी दिली जात असेल तर शिंदे गट भविष्यात महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवण्याच्या तयारीत आहे? अर्थात सरकारचा हा गुवाहाटीफेम सिनेमा म्हणा किंवा तमाशा, महाराष्ट्राची जनताच उद्या डब्यात घातल्याशिवाय राहणार नाही, एवढे ध्यानात ठेवा!", असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in