Air India Plane Crash: रोशनी सोनघरेची इंस्टाग्रामवरची शेवटची पोस्ट अन्...
Roshni Songhare: मूळची डोंबिवलीची असलेली रोशनी सोनघरे हिच्यासारख्या प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी व्यक्तीचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT

डोंबिवली: गुजरातच्या अहमदाबाद येथे 12 जून 2025 रोजी घडलेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरून टाकलं. एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर (फ्लाइट AI-171) विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण करताच अवघ्या काही मिनिटांत त्याचा मेघानी नगर परिसरात अपघात झाला. या दुर्घटनेत 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला, तर केवळ एक प्रवासी बचावला. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये डोंबिवली येथील रहिवासी आणि एअर इंडियाची फ्लाइट क्रू मेंबर रोशनी राजेंद्र सोनघरे हिचाही समावेश आहे.
कोण होती रोशनी सोनघरे?
रोशनी सोनघरे ही 27 वर्षीय तरुणी ही डोंबिवली येथील रहिवासी होती. ती डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमिया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई-वडील (राजेंद्र आणि राजश्री सोनघरे) आणि भाऊ विघ्नेश यांच्यासोबत राहत होती. रोशनीला लहानपणापासूनच हवाई सुंदरी (फ्लाइट अटेंडंट) बनण्याचे स्वप्न होतं. या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी तिने प्रचंड मेहनत आणि जिद्द दाखवली. गेल्या दोन वर्षांपासून ती एअर इंडियामध्ये फ्लाइट क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती.
रोशनी केवळ एक यशस्वी फ्लाइट अटेंडंटच नव्हती, तर ती एक लोकप्रिय ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर देखील होती. तिच्या इंस्टाग्राम खात्यावर 56,000 हून अधिक फॉलोअर्स होते. तिने आपल्या प्रवासातील अनुभव, अनोखी शैली आणि सकारात्मक ऊर्जेने अनेकांची मने जिंकली होती. तिच्या ट्रॅव्हल व्लॉग्सना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळायचा.