मुंबई: सतत आत्महत्येची धमकी देणं ही क्रूरताच! घटस्फोटानंतर पत्नीला 25 लाख आणि दोन फ्लॅट्स... हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
कोणत्याही साथीदाराकडून वारंवार आत्महत्येच्या धमक्या देणं हा मानसिक छळ असून ती क्रूरता असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घटस्फोटानंतर पत्नीला 25 लाख आणि दोन फ्लॅट्स देण्याचे आदेश
मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Mumbai Case: मुंबई हायकोर्टाने एका कौटुंबिक वादाच्या प्रकरणासंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोणत्याही साथीदाराकडून वारंवार आत्महत्येच्या धमक्या देणं हा मानसिक छळ असून ती क्रूरता असल्याचं न्यायालयाने सांगितलं. कोर्टाने याच आधारे एका तरुणाला पत्नीपासून घटस्फोट देण्याचा आदेश दिला आहे. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
बऱ्याच वर्षांपासून वेगळे राहत होते
हे प्रकरण हे 2006 मध्ये लग्न झालेल्या एका जोडप्याशी संबंधित आहे. खरं तर, 2012 पासून हे पती आणि पत्नी वेगळे राहत होते. त्या दोघांमधील वाद काही केल्या मिटत नव्हता आणि यामुळेच 2019 मध्ये पतीने कोर्टात पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अर्ज दाखल केला. पतीचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्यांनी त्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
पत्नीचं वागणं क्रूरतेच्या श्रेणीत...
पतीच्या आरोपानुसार, त्याची पत्नी ही सतत आत्महत्या करण्याची धमक्या द्यायची. इतकेच नव्हे तर, तिने बऱ्यादा आत्मत्येचा प्रयत्न सुद्धा केला होता. शिवाय, पत्नीला पतीवर अनैतिक संबंधाचा संशय होता आणि यामुळे नातं अधिक तणावग्रस्त होत होतं. पत्नीवर आरोप करत तिचं हे वागणं क्रूरतेच्या श्रेणीत येत असल्याने हिंदू विवाह अॅक्टअंतर्गत हे घटस्फोटाचं मुख्य कारण ठरत असल्याचं तो म्हणाला.
हे ही वाचा: लंडनमध्ये नोकरी आणि व्हिसा मिळवून देण्याची ऑफर! परदेशात सेटल होण्याच्या नादात मुंबईतील जोडप्याची मोठी फसवणूक...
हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
यासंदर्भात उच्च न्यायालयाने म्हटलं की, वारंवार आत्महत्या म्हणजेच जीव देण्याची धमकी देणं किंवा साथीदारावर मानसिक दबाव निर्माण होईल असं वर्तन करणं ही एक प्रकारची क्रूरताच आहे. न्यायालयाने पत्नीच्या अशा वागण्यावरून लग्न टिकवणं कठीण होत असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही उल्लेख केला.










