Mithi River: मुंबईकरांनो, तुमच्या मिठी नदीचं मरण उघड्या डोळ्यांनी पाहा! मुंबई Tak ची 'ही' डॉक्यूमेंट्री तुम्हाला टाकेल हादरवून!
Mithi River Documentary: मुंबईतील मिठी नदी आणि तिच्यावर नेहमीच चर्चा होते. पण मुंबई Tak ने मुंबईच्या मिठी नदीचं मरणच अवघ्या जगासमोर आणलं आहे. पाहा ही विशेष डॉक्युमेंट्री.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मिठी - एका नदीचं मरण
मुंबईतील मिठी नदीवरील विशेष डॉक्यूमेंट्री
मुंबई Tak ची विशेष ड्रॉक्यूमेंट्री म्हणजे प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन
मुंबई: 26 जुलै 2005 मुंबईकरांच्या आयुष्यातील भयंकर दिवस होता तो.. 25 जुलैच्या रात्रीपासून उपनगरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे पाणी तुंबायला लागलं. उपनगरात कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यात तिथल्या इमारती आणि तिथली माणसं अडकून पडली होती. या भरलेल्या पाण्यात अनेक माणसं आणि संसार.. मुंबईत आलेल्या महाप्रलयात वाहून जात होते, गटांगळ्या खात होते.
घराच्या ओढीने ऑफिस सोडून निघालेले मुंबईकर ट्रेन, बस आणि रिक्षामध्ये भरलेल्या पाण्यात अडकून पडले होते. तर काही जण ऑफिसमध्येच राहिले होते. बीकेसीमध्ये तेव्हा एक डबलडेकर बस संपूर्ण पाण्याखाली गेली.. अशी हृदय हेलावणारी दृश्य मुंबईच्या अनेक भागात, गल्ल्यांमध्ये दिसत होती.

असा महापूर मुंबईने कधीच पाहिला नव्हता...
मुंबईत पाऊस येणं आणि पाणी भरणं ही काही पहिल्यांदाच घडलेली घटना नाही. वर्षानुवर्ष मुंबईमध्ये जेव्हा-जेव्हा खूप पाऊस पडतो. किंवा सलग पाऊस पडतो 4-5 तास.. तेव्हा मुंबईतील कोणत्या ना कोणत्या भागात पाणी भरण्याचे प्रकार होतच असतात. हे अनेक वर्ष.. जेव्हापासून मुंबईची निर्मिती झाली आहे तेव्हापासून मुंबईने या गोष्टी बघितलेल्या आहेत.
2005 मध्ये सुद्धा.. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि मला अजूनही आठवतंय की, मी ऑफिसकडे निघालेलो असताना दुपारपर्यंत ग्रँटरोड आणि इतर स्टेशनमध्ये पाणी भरण्यास सुरूवात झाली होती. तेव्हा साधारण अंदाज आला होता की, पूरस्थिती आहे.
अनेक वर्ष रिपोर्टिंग करत असल्यामुळे ही देखील कल्पना आली होती की, ज्यावेळेस भरपूर पाऊस पडतो त्याचवेळेस जर समुद्राला भरती असेल तर त्यामुळे देखील पाणी भरतं. ओहोटीची वाट बघितली जात होती की, ओहोटी आली की, त्या पाण्याचा निचरा होईल.
पण त्या दिवशी काही तरी वेगळंच घडत होतं. आम्ही अनेक ठिकाणांहून गोष्टी पाठवत होतो. ट्रेन बंद झालेल्या असल्यामुळे आमचं ऑफिस असलेल्या नरीमन पॉईंटवरून आम्ही रस्त्याने उपनगरांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस लक्षात आलं की, माहिमच्या पलीकडे उपनगरांमध्ये जातच येत नाहीए. त्यामुळे काही तरी वेगळं घडलंय याची साधारण कल्पना आली.
त्यादिवशी रात्री अचानक ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणांवरून लोकांचे फोन यायला लागले लँडलाइनवर की, आम्ही या-या ठिकाणी अडकलो आहोत. खासकरून पूर्व उपनगरांमध्ये बऱ्याच ठिकाणांहून फोन ऑफिसमध्ये येत होते.
मला आठवतंय की, दुसऱ्या दिवशी मुंबई महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, 'आम्ही मदत द्यायला चाललो आहोत हेलिकॉप्टरने.' हे मी कधीच ऐकलं नव्हतं की, मुंबईत कधी हेलिकॉप्टरने लोकांना मदत पुरवली जाईल.
त्यावेळी आम्ही त्यांच्या बरोबर गेलो. त्यावेळेस पहिल्यांदा मला लक्षात आलं की, मुंबईची काय अवस्था झाली आहे. आदल्या दिवशी दुपारच्या सुमारास पाणी भरायला सुरूवात झाली होती आणि आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी 3-4 वाजेच्या सुमारास गेलो होतो. तुम्हाला विश्वास नाही बसणार की, त्याही वेळेस मुंबईमध्ये काहीच दिसत नव्हतं. फक्त पाणी..
मला कुर्ला स्टेशन आठवतंय की, तिथे लोकं टपावर बसले होते. तिथे खाली खाण्याचे फूड पॅकेट टाकत होते. ती मुंबई कधीच बघितली नव्हती.
साहिल जोशी, मॅनेजिंग एडिटर, मुंबई Tak










