Dahi Handi 2025: ठाण्यात विश्वविक्रम, 10 थरांची कडक सलामी... 'कोकण नगर' गोविंदा पथकाने रचला इतिहास

Kokan Nagar Govinda Pathak World Record: संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाण्यातील दहीहंडी उत्सवाने यंदा एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. कोकण नगर गोविंदा पथकाच्या 10 थरांच्या विश्वविक्रमी कामगिरीने या उत्सवाला ऐतिहासिक बनवले आहे.

world record in thane jogeshwari konkan nagar mandal put 10 thar in dahi handi festival record set in dahi handi festival of pratap sarnaik in thane
फोटो सौजन्य: प्रताप सरनाईक/Instagram
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्यातील संस्कृती दहीहंडी उत्सवात विश्वविक्रम

point

कोकण नगर गोविंदा पथकाने रचले 10 थर

point

10 थरांचा थरार, कोकण नगर गोविंदा पथकाची कडक सलामी

Kokan Nagar Govinda 10 Thar: ठाणे: ठाण्यातील वर्तकनगर येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित "संस्कृती दहीहंडी" उत्सवाने यंदा इतिहास रचला आहे. कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थरांचा मानवी मनोरा रचून जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. मागील काही वर्षात जय जवान गोविंदा पथक हे सातत्याने 9 थर रचत आलं आहे. मात्र, त्यांना 10 थरांचा इतिहासाला गवसणी घालता येत नव्हती. यंदा हे मंडळ 10 थर रचतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, अत्यंत आश्चर्यरित्या जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा मंडळाने कडक 10 थर रचून विश्वविक्रमाला गवसणी घातली. ठाण्यात येऊन जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा मंडळाने जो इतिहास रचला त्यामुळे त्यांनी देशभरातील गोविंदा पथकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

कोकण नगर गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

कोकण नगर गोविंदा पथकाने यंदा 10 थरांचा मानवी मनोरा रचून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी जय जवान गोविंदा पथकाने 2012 मध्ये 9 थर रचून विश्वविक्रम नोंदवला होता, परंतु कोकण नगर पथकाने यंदा हा विक्रम मोडला. या थरारक कामगिरीसाठी पथकाने अनेक महिने कठोर सराव केला होता. 10 थरांचा मनोरा रचताना गोविंदांनी दाखवलेली शिस्त, समन्वय आणि धाडस यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

फोटो सौजन्य: प्रताप सरनाईक/instagram

या विश्वविक्रमी कामगिरीबद्दल बोलताना कोकण नगर पथकाच्या प्रमुखाने सांगितले, “हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आहे. आमच्या पथकाने अनेक अडचणींवर मात करत हा विश्वविक्रम रचला. आम्हाला संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.”

दहीहंडी उत्सवाची भव्यता

संस्कृती युवा प्रतिष्ठानचा हा दहीहंडी उत्सव ठाण्यातील मानाचा उत्सव मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला, परंतु कोकण नगर गोविंदा पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44 च्या पटांगणावर हा उत्सव रंगला. यंदाच्या उत्सवाची थीम बॉलिवूडच्या ‘शोले’ चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ठेवण्यात आली होती, ज्यामुळे उत्सवाला सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक रंगत आली.

परिवहन मंत्री आणि ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला एका नव्या उंचीवर नेले आहे. यंदा त्यांनी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाख रुपये आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्याची घोषणा केली होती. याशिवाय, पहिल्यांदा 9 थर लावणाऱ्या पथकाला 11 लाख रुपये, 8 थरांसाठी 25 हजार रुपये, 7 थरांसाठी 15 हजार रुपये, 6 थरांसाठी 10 हजार रुपये आणि 5 थरांसाठी 5 हजार रुपये बक्षिसाची घोषणा केली होती. या भव्य बक्षिसांमुळे गोविंदा पथकांमध्ये उत्साह आणि चुरस वाढली होती.

प्रताप सरनाईक यांनी या यशाबद्दल कोकण नगर गोविंदा पथकाचे अभिनंदन केले आणि सांगितले, “हा विश्वविक्रम ठाण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान नेहमीच गोविंदांच्या धाडसाला आणि कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. यंदा 10 थरांचा विश्वविक्रम रचून कोकण नगर पथकाने इतिहास घडवला आहे.”

ठाण्यातील दहीहंडीची परंपरा

ठाणे शहर दहीहंडी उत्सवासाठी पंढरी म्हणून ओळखले जाते. येथील दहीहंडी उत्सवात दरवर्षी अनेक गोविंदा पथके सहभागी होतात आणि मानवी मनोऱ्यांच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवतात. यंदा कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचून ठाण्याच्या या परंपरेला एका नव्या उंचीवर नेले आहे. याशिवाय, जय जवान आणि आर्यन्स गोविंदा पथकांनीही 9 थर रचून आपली छाप पाडली आहे.

प्रेक्षकांचा उत्साह आणि भविष्यातील अपेक्षा

हा विश्वविक्रमी क्षण पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. स्थानिक नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी या उत्सवाचा आनंद लुटला.

हे वाचलं का?

    follow whatsapp