नाशिकमध्ये पूर.. धडकी भरवणारी दृश्य, पावसाचं थैमान! पुण्यातही पावसाचा धुमाकूळ
Rain Update: नाशिक आणि पुण्यात सध्या तुफान पाऊस बरसत असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मागील काही तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
ADVERTISEMENT

नाशिक: मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातील गोदावरी नदी पात्राला पूर आला आहे. त्यामुळे या भागात पाणी साचलं असून अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड परिसरात गोदावरी नदीचं पात्राने इशारा पातळी ओलांडली असून सध्या सर्व परिसर जलमय झाला आहे. ज्यामध्ये एक कारही पाण्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या गोदावरी नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे.
नदीकाठावरील अनेक मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पावसामुळे शहरातील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक मंदिरं पुराच्या पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, नदीकाठावरील मंदिरे आणि घाट पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या मंदिरांमध्ये श्री रामकुंड, काळाराम मंदिर आणि इतर ऐतिहासिक स्थळांचा समावेश आहे. स्थानिक प्रशासनाने रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पाण्याचा वाढता स्तर लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक शहरातील विविध भागांमध्ये पाणी साठले असून, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने आपत्कालीन सेवांचे नियोजन केले असून, पाण्याखाली गेलेल्या भागांतून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.