Pune: कारला साईड न दिल्याने कोथरूडमध्ये थेट गोळीबार, कोण आहे निलेश घायवळ ज्याची गँग घालतेय पुण्यात राडा
Who is Nilesh Ghaiwal: पुण्यातील निलेश घायवळ याच्या टोळीतील काही गुंडांनी एका व्यक्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

छाया काविरे, पुणे: पुणे शहर पुन्हा एकदा गँगवारच्या छायेत दिसतंय. नुकत्याच नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात 19 वर्षाच्या आयुष कोमकरची निर्दयपणे हत्या करण्यात आली. ऐन गणेशविसर्जनाच्या काळात झालेल्या या हत्येने पुणे हादरलं. अशातच ही घटना ताजी असतानाच पुण्यातल्या कोथरुड भागात मध्यरात्री किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याची घटना घडलीय. हा गोळीबार दुसरं कोणी नाही तर कुख्यात निलेश घायवाळ टोळीकडून करण्यात आलाय. या फायरिंगमध्ये एक जण गंभीर जखमी झालाय. महत्वाचं म्हणजे फायरिंगचं कारणं जर तुम्ही ऐकलंच तर तुम्हालाही धक्का बसेल. त्यामुळे पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं? कोण आहे घायवाळ गॅंग? आणि हा गोळीबार नक्की का करण्यात आला? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
तर घडलं असं की, कोथरूडमधल्या एका चौकात मध्यरात्री ‘रस्ता न दिल्याचा’ वाद चिघळला. एका चारचाकी वाहनचालकाने घायवळ टोळीच्या गुंडाना पुढे जायला साईड दिली नाही. त्यामुळे घायवळ गॅंगचा मुसा शेख, रोहित आखाडे, गणेश राऊत आणि मयूर कुंभारे यांना संताप आला. आणि संतापात घायवळ गँगच्या या गुंडांनी कारमधल्या प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कोथरुडमधल्या शिंदेचाळ परिसरात हा थरार घडलाय. या घटनेत चारचाकी चालक प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झालेत. त्यांना तीन गोळ्या लागल्या असून सह्याद्री रुग्णालयात प्रकाश धुमाळ यांच्यावर उपचार सुरूय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मयूर कुंभारे याने गोळ्या झाडल्या, गोळ्या धुमाळच्या मानेला आणि मांडीला लागल्या.
हे ही वाचा>> तरुण गेला वेश्याकडे अन् केली मौज मज्जा, नंतर ऑनलाईन पैसे देताना विसरला पासवर्ड, महिलांनी मिळून तुडव तुडव तुडवला अन्...
कोण आहे निलेश घायवळ?
आता ज्या घायवाळ गँगने हा सगळा थरार केलाय त्यांचा मुखिया निलेश घायवाळ नक्की कोण आहे? तर निलेश घायवळ हा पुण्यातला कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी आणि दहशत पसरवणं यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुण्यातल्या कोथरुड, मुळशी आणि इतर परिसरात त्याच्या गुन्हेगारी कारवायांची दहशत आहे.
निलेश घायवळचा जन्म पुण्यातच झाला. त्याने पुण्यातच M.COM पर्यंतच शिक्षण पूर्ण केलंय. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो गुन्हेगारी विश्वाकडे वळला आणि गजानन मारणे या दुसऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या संपर्कात आला. त्यावेळी या दोघांनीही एकत्र अनेक गुन्हे केले, त्यापैकी एका गुन्हेगाराच्या खुनाच्या प्रकरणात त्यांना सात वर्षांची शिक्षा झाली. पुढे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला, ज्यामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाले. मारणेसोबत फूट पडल्यानंतर घायवळने स्वतःची गुन्हेगारी टोळी तयार केली. आणि कोथरुड, मुळशी आणि पुणे शहरातल्या इतर भागात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. जमीन व्यवहार, खंडणी आणि दलालीतून त्याने करोडो रुपये कमावले.