गजानन मारणे गँगची हवाबाजी बंद! पुणे पोलिसांचा मोठा दणका, 'त्या' 15 लक्झरी गाड्या...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी जवळीक असलेल्या एका भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मारणेला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गजानन मारणेची हवाबाजी बंद! पोलिसांची मोठी कारवाई

गजानन मारणे गँगच्या 15 गाड्या जप्त
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत क्राइम ब्रँचने मारणे गँगच्या 15 वाहनांवर जप्तीची कारवाई करत त्याला झटका दिलाय. या गाड्यांमध्ये दोन टोयोटा फॉर्च्युनर, एक महिंद्रा थार, एक टाटा नेक्सॉन, चार लक्झरी कार आणि अनेक दुचाकींचा समावेश आहे.
मारणे आणि त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी जवळीक असलेल्या एका भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मारणेला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे कोर्टाने मारणेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा >> शिवराजला मारणाऱ्या समाधान मुंडेला बेदम मारहाण? नव्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
गजानन मारणे हे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातलं चर्चेतलं नाव आहे. त्याची टोळी खंडणी, धमक्या आणि बेकायदा वसुलीसाठी कुप्रसिद्ध आहे. यापूर्वीही या टोळीवर कारवाई झाली असली, तरी यावेळी पोलिसांनी हवाबाजी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर हल्ला केला आहे. क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, ही वाहनं खंडणी आणि धमकीच्या घटनांमध्ये नियमित वापरली जात होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचा वापर कसा होत होता याचा शोध घेतला.
क्राइम ब्रँचचे उपायुक्त निखिल पिंगळे म्हणाले, “मारणे याला येरवडा तुरुंगातून सांगली तुरुंगात हलवताना काही वाहनं त्याच्या मागे होती. या वाहनांमधून त्याला पैसे आणि इतर साहित्य पुरवलं गेलं. ही वाहनं आता जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.”
हे ही वाचा >> हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान कनेक्शन, अखेर वडिलांनी सांगितली खरी कहाणी
पिंगळे पुढे म्हणाले, “मारणे हा MCOCA अंतर्गत हाय-प्रोफाइल गुन्हेगार आहे. त्याला मदत करणाऱ्या कोणालाही सहआरोपी ठरवलं जाऊ शकते. याअनुषंगाने तीन जणांची नावं सहआरोपी म्हणून नोंदवली असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे.” ही कारवाई केवळ मारणे गँगपुरती मर्यादित नसून, शहरातील इतर गुन्हेगारी टोळ्यांसाठीही इशारा आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.