Pune: पुनीत बालन ग्रुपचा मोठा निर्णय, DJ मुक्त दहीहंडी करणार साजरी
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात पारंपारिक वाद्यांच्या सुरात दहीहंडी उत्सव साजरी करण्याचा निर्णय पुनीत बालन ग्रुपने घेतला आहे.
ADVERTISEMENT

पुणे: शहरातील 23 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळाची पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहीहंडी यंदा डीजे मुक्त साजरी केली जाणार आहे. डीजे न लावता पारंपारिक ढोल ताशांसह प्रभात बॅन्ड, मुंबईतील नामांकित वरळी बिट्स यांच्या वाद्य संगीताच्या तालावर यंदाची दहीहंडी फोडली जाणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी रस्त्यांवरील ऐतिहासिक लाल चौकात गतवर्षीपासून पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू करण्यात आला आहे. प्रामुख्याने चौक-चौकात होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी बालन यांनी या संयुक्त दहीहंडीसाठी पुढाकार घेतला होता.
हे ही वाचा>> पुण्यात "श्री उवसग्गहरं स्तोत्र"च्या सामूहिक पठणाचे भव्य आयोजन
त्याला प्रतिसाद देत पहिल्याच वर्षी 35 मंडळांनी एकत्र संयुक्त दहीहंडी साजरी केली होती. आता पुन्हा सलग दुसऱ्या वर्षी ही संयुक्त दहीहंडी साजरी केली जाणार आहे. मात्र, यावर्षी पुनीत बालन यांनी डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीत उत्सवातही डीजे न लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा पारंपारिक वाद्यांच्या गजरात दहीहंडी फोडली जाणार आहे.

त्यानुसार दहीहंडीला सुरवातीला युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा यांचे ढोल वादन होणार आहे. त्यानंतर प्रभात बॅन्डचे वादन होणार आहे. त्यानंतर मुंबईतील प्रसिध्द बँजो वरळी बिट्स यांच्या संगीत तालावर दहीहंडी फोडली जाणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उज्जैन येथील पारंपारिक शिव महाकाल या कार्यक्रम यावेळी होणार असल्याची माहिती पुनीत बालन यांनी दिली.










