पुणे : 'एवढा मोठा घोडा झालाय तरी अजून...'; शरद पोंक्षे यांची राहुल गांधींवर टीका

शरद पोंक्षे पुण्यातील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?; 'माझे खूप जवळचे स्नेही आता मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) झाले आहेत, त्यांना मी या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीने बघायला लावेन'
Sharad Ponkshe and Rahul Gandhi
Sharad Ponkshe and Rahul Gandhi

मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. एवढा मोठा घोडा झालाय, तरी अजून गोळवलकर बोलता येत नाही,' अशा शब्दात शरद पोंक्षे यांनी टीका केलीये.

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या (डीईएस) मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या तर्फे 'मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिल्लीतील ५० वर्षाचा मुलगा म्हणत राहुल गांधींवर टीका केलीये.

शरद पोंक्षे राहुल गांधींबद्दल काय म्हणाले?

राहुल गांधींचा नामोल्लेख न करता शरद पोंक्षे म्हणाले, "रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना पण सावरकर लागतात. ही मुलं बघा अन् दिल्लीतील पण मुलगा बघा. मुला मुलांमध्येही किती फरक असतो नाही? या मुलांना कळतंय आणि एवढा मोठा घोडा झाला तरी त्याला अजून कळत नाही. पन्नाशी आली, तरी गोळवलकर हा शब्द त्याला म्हणता येत नाही. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे गोळवलकरांचा विचार हा फार लांबचा विषय आहे," अशी टीका शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींवर केलीये.

सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे- शरद पोंक्षे

शरद पोंक्षे म्हणाले, "इतका अपमान कधी झाला नसेल. आज ७५ वर्षे झाली, फक्त त्यांना सावरकरचं लागतात. जेव्हा ८० टक्के हिंदूंना दुखवायचं असेल, ८० टक्के हिंदूंचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल, तर एकाच माणसावर चिखलफेक करा ८० टक्के हिंदू समाज दुखावतो, इतकी सावरकर नावाची दहशत आहे. ब्रिटिशांना होती. काँग्रेसला होती, आजही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे. सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आला आहे म्हटल्यावर घाबरले पाहिजे," असं शरद पोंक्षे कार्यक्रमात म्हणाले.

महाराष्ट्रात प्रत्येक गावात गोळवलकर विद्यालय हवं -पोंक्षे

"महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय का आहे? प्रत्येक गावात असं विद्यालय हवं. असे कार्यक्रम व्हायला हवेत. या मुलांनी खूप छान कार्यक्रम केला. सगळ्या शिक्षकांना नमस्कार करायचा आहे. असे शिक्षक प्रत्येक शाळेत हवेत. संकल्पना सूचणं आणि अंमलात आणणं अवघड असतं," असं शरद पोंक्षे म्हणाले.

"मुख्यमंत्र्यांना जबरदस्तीने कार्यक्रमाची सीडी बघायला लावेन"

याच कार्यक्रमात शरद पोंक्षे म्हणाले, "काय करता येईल याचा विचार मी करतोय. या कार्यक्रमाचं लोण महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे. माझे खूप जवळचे स्नेही आता मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना मी या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीनं बघायला लावेन. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम झाला पाहिजे. जिथं अनेक शाळेत सावरकरांचा फोटो लावला जात नाही, अन् धडा शिकवला जात नाही, भलतंच शिकवलं जातं तिथे असा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने करायला लावू," असं शरद पोंक्षे यांनी या कार्यक्रमात सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in