एकाच व्यक्तिचा तीन वेळा मृत्यू? ग्रामसेवकानंच थेट तीन प्रमाणपत्र दिले, बीडमधली घटना नेमकी काय?
या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेले मयत माधव ठोंबरे यांचे पुत्र शिवाजी ठोंबरे यांनी ग्रामसेवक किरण माणिक ठोंबरे यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील ग्रामसेवक किरण माणिक ठोंबरे यांनी एकाच व्यक्तीच्या नावे वेगवेगळ्या वर्षांचे तीन मृत्यू प्रमाणपत्र जारी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मयत व्यक्तीच्या मुलाने बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
दहिफळ (वडमाऊली) गावातील रहिवासी माधव ठोंबरे यांचा मृत्यू 1979 साली झाला होता. त्यांच्या मुलाने, शिवाजी ठोंबरे यांनी त्यावेळी मूळ मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त केले होते, जे 1979 सालचे होते. मात्र, नंतर भावकीतील काही व्यक्तींनी ग्रामसेवक किरण माणिक ठोंबरे यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने सन 2001 मध्ये मृत्यू झाल्याचे दुसरे मृत्यू प्रमाणपत्र मिळवले.
हे ही वाचा >> धक्कादायक! रस्त्याच्या कडेला बास्केटमध्ये दोन दिवसांचं नवजात अर्भक, चिठ्ठीत लिहिलं मला माफ करा...नेमकं काय घडलं?
विशेष म्हणजे, जेव्हा शिवाजी ठोंबरे यांनी पुन्हा मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली, तेव्हा ग्रामसेवकाने त्यांना 2008 साली मृत्यू झाल्याचे तिसरे मृत्यू प्रमाणपत्र दिले. धक्कादायक बाब म्हणजे, ही सर्व तीनही मृत्यू प्रमाणपत्रे 2023 मध्ये जारी करण्यात आली आहेत.
मयताच्या मुलाची तक्रार
या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेले मयत माधव ठोंबरे यांचे पुत्र शिवाजी ठोंबरे यांनी ग्रामसेवक किरण माणिक ठोंबरे यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी ग्रामसेवकाने बनावट आणि चुकीच्या पद्धतीने मृत्यू प्रमाणपत्रे जारी केल्याचा आरोप केला आहे. यामुळे कुटुंबाला मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.










