थंडीने कुडकुडू लागले म्हणून रुममध्ये शेगडीत शेकोटी पेटवली, पण झोपेत श्वास घेता आला नाही, 3 मित्रांचा गुदमरुन मृत्यू
Belagavi News : थंडीने कुडकुडू लागले म्हणून रुममध्ये शेगडीत शेकोटी पेटवली, पण झोपेत श्वास घेता आला नाही, 3 मित्रांचा गुदमरुन मृत्यू
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
थंडीने कुडकुडू लागले म्हणून रुममध्ये शेगडीत शेकोटी पेटवली
पण झोपेत श्वास घेता आला नाही, 3 मित्रांचा गुदमरुन मृत्यू
Belagavi News : बेळगाव शहरातील अमननगर भागात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी खोलीत कोळशाची शेगडी पेटवून झोपलेल्या चार मित्रांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक तरुण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये रिहान मते (22), सरफराज हरपणहळ्ळी (22) आणि मोईन नलबंध (23) या तिघांचा समावेश असून शहानवाज (19) हा तरुण गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.
अमननगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहणारे हे चारही तरुण सोमवारच्या रात्री थंडीचा कडाका वाढल्याने विशेष काळजी घेत झोपण्याच्या तयारीत होते. गारवा टाळण्यासाठी त्यांनी कोळशाची शेगडी पेटवली आणि झोपेत थंडी लागू नये म्हणून खोलीचे सर्व दरवाजे व खिडक्या घट्ट बंद केल्या. मात्र हाच निर्णय त्यांच्या जीवावर बेतला.
कोळसा जळताना निर्माण होणारा कार्बन मोनोऑक्साइड हा अत्यंत विषारी वायू खोलीत भरत गेला. दरवाजे-खिडक्यांची हवा खेळती नसल्याने हा वायू बाहेर निघू शकला नाही. झोपेत असलेल्या तरुणांना परिस्थितीची जाणीवही झाली नाही. काही वेळातच खोलीतील ऑक्सिजनची पातळी घटली आणि श्वसनास त्रास होऊ लागला. परिणामी तिघांचा जागच्या जागी मृत्यू झाला. शहानवाजला मात्र काहीसा श्वास मिळाल्याने तो गंभीर अवस्थेत सापडला आणि तातडीने रुग्णालयात हलवण्यात आला.










