डोंबिवली : 140 हून अधिक तरुणी प्रेमाच्या जाळ्यात, लाखोंची लुबाडणूक; तरुणानं कसं गंडवलं?

मिथिलेश गुप्ता

सोशल मीडियावर मैत्री आणि प्रेमाचं आमिष दाखवत तरुणींना लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका भामट्याचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

ADVERTISEMENT

Dombivali Crime
Dombivali Crime
google news

बातम्या हायलाइट

point

डोंबिवली : 140 हून अधिक तरुणी प्रेमाच्या जाळ्यात,

point

लाखोंची लुबाडणूक;

point

तरुणानं कसं गंडवलं?

डोंबिवली : सोशल मीडियावर मैत्री आणि प्रेमाचं आमिष दाखवत तरुणींना लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका भामट्याचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून प्रेमसंबंध प्रस्थापित करायचे, लग्नाची स्वप्नं दाखवायची आणि त्यानंतर संबंधित तरुणींच्या नावावर बँकांकडून लाखो रुपयांचं कर्ज काढून फरार व्हायचं, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदर्श म्हात्रे असं आरोपीचं नाव असून त्याने तब्बल 140 हून अधिक तरुणींना जाळ्यात ओढल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

लग्नाची स्वप्नं दाखवायची अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदर्श म्हात्रे हा मूळचा पनवेल परिसरातील रहिवासी असून तो सोशल मीडियावर तरुणींशी मैत्री करत होता. सुरुवातीला गोड बोलून विश्वास संपादन करायचा, त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाची आणि भविष्यातील आयुष्याची स्वप्नं दाखवत संबंधित तरुणींना भावनिकरित्या गुंतवायचं, असा त्याचा पद्धतशीर डाव होता. विश्वास बसल्यानंतर आरोपी संबंधित तरुणींच्या नावावर विविध बँकांमधून लाखो रुपयांचं कर्ज काढत असे. कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर मात्र आरोपी संपर्क तोडून फरार होत असल्याचं तपासात समोर आलं आहे. 

हे ही वाचा : 11 वर्षीय मुलगी भावाला उठवायला गेली अन्..., लाईट गेल्यावर घरात काय घडलं?

असं बाहेर आलं प्रकरण

या प्रकरणात आतापर्यंत 11 महिला आणि तरुणींनी मानपाडा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रारी दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या बहुतांश महिला उच्चशिक्षित असून त्या कॉर्पोरेट, बँकिंग, आर्थिक आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डोंबिवलीतील एका पीडित तरुणीने धाडस दाखवत तक्रार नोंदवल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. याआधीही नवी मुंबई पोलिसांनी अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आदर्श म्हात्रेला अटक केली होती. 

हे ही वाचा : कुटुंबातील सगळे घरातच होते, IPS अधिकाऱ्याची मुलगी दुसऱ्या रुममध्ये गेली अन्

कोट्यवधी रुपयांची फसवणूक

माध्यमांमधील बातम्या पाहिल्यानंतर आणखी काही महिलांनी पुढे येत तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. मानपाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स आणि बँक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. पोलिसांना संशय आहे की आरोपीने केवळ डोंबिवली आणि नवी मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतर शहरांतील महिलांनाही गंडा घातला असू शकतो. फसवणुकीची रक्कम कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावरील अनोळखी ओळखी, प्रेमसंबंध आणि आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
 

हे वाचलं का?