Suraj Chavan : आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांच्या घरासह 16 ठिकाणी ED चे छापे
भाजप नेते सोमय्या यांच्या आरोपानुसार लाईफलाईन हॉस्पिटल सर्व्हिसेसने कोरोना काळात कोविड सेंटर आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटामध्ये घोटाळा केला आहे.
ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) Leaders on ED Radar : उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या अनेक नेत्यांमागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असून, त्यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्यासह काही लोकांच्या घरावर ईडीने आज छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार 16 ठिकाणी ईडीच्या पथकांनी धाड टाकली.
कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात आज ईडीने मोठी कारवाई केली. ईडीच्या पथकांनी युवा सेनेचे (UBT) सचिव सूरज चव्हाण यांच्या घरासह मुंबईतील तब्बल 16 ठिकाणी छापे टाकले. यात आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या मालमत्तांचाही समावेश आहे.
हेही वाचा >> पुणे : पत्नीसह दोन मुलांना संपवलं अन् डॉक्टरने केली आत्महत्या, कारण…
सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कोविड सेंटर सुरू करण्यात आली होती. या कोविड केंद्रामध्ये 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने तपास सुरू केला असून, मुंबईतील 16 ठिकाणी छापेमारी केली आहे.
भाजप नेते सोमय्या यांच्या आरोपानुसार लाईफलाईन हॉस्पिटल सर्व्हिसेसने कोरोना काळात कोविड सेंटर आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटामध्ये घोटाळा केला आहे. त्यांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. याप्रकरणात उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे सुजीत पाटकर यांचाही सहभाग असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे.